राजीव आवास योजनेवरून पालिकातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. मतदारांना भुलविण्यासाठी या योजनेची जहिरातबाजी करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नसल्याचा आरोप पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला, तर त्याला प्रत्युत्तर देताना विरोधकांची त्रेधातिरपीट उडाली. परंतु प्रशासनाच्या नरोवाकुंजरोवा भूमिकेमुळे सत्ताधारी पेचात पडले.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजीव आवास योजनेची घोषणा करण्यात आली. विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्यापूर्वीच सरकारने ही योजना जाहीर केल्याबद्दल भाजप नगरसेवक मनोज कोटक यांनी आक्षेप घेतला. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राजीव आवास योजना जाहीर करून सरकार मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप शिवसेना-भाजप नगरसेवकांकडून करण्यात आला. राजीव आवास योजनेच्या जाहिरातबाजीला ऊत आला आहे. मुंबईत झळकविण्यात आलेले या योजनेचे फलक तात्काळ काढून टाका, अशी मागणी भाजप पटनेते दिलीप पटेल यांनी करताच शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.