मुंबई : महाविकास आघाडी म्हणून आपण करोनासारख्या जागतिक संकटाला तोंड दिले आहे. त्यापुढे आताचे राजकीय संकट काहीच नाही. यापुढेही आपण तिघे एकत्र राहिलो तर देशात वेगळा संदेश जाईल आणि राज्यातील चित्र नक्की बदलेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत व्यक्त केला. यापुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा सूर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी लावला.
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी विधान भवनात येऊन महाविकास आघाडीची बैठक घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते या वेळी उपस्थित होते. यापुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढाव्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असा सूर महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावला. आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षांला आपण मागे हटणार नाही, मरण पत्करू पण शरण जाणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी म्हणून आपण एकजुटीने राहिल्यास आताचे राजकीय संकट परतून लावू. यापुढेही आपण तिघे एकत्र राहिलो तर देशात वेगळा संदेश जाईल. असे राजकीय प्रयोग होत राहतील आणि महाराष्ट्रातील राजकीय चित्रही नक्की बदलेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
हे सरकार स्थापन होताना मला सांगितले जायचे की काँग्रेस – राष्ट्रवादी दगाफटका करतील. पण मला हे सांगायला लाज वाटते की आमच्याच लोकांनी दगाफटका केला. यांना आम्ही खूप सन्मान दिला पण यांनीच आमचा घात केला, जे आपले होते तेच आपले शत्रू झाले, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली.
माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळय़ांवर पट्टी असली तरी जनता उघडय़ा डोळय़ाने सर्व बघत आहे. सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागणार आहे, त्यावरून देशात लोकशाही राहणार की बेबंदशाही हे जगासमोर स्पष्ट होणार आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले. महाआघाडीच्या रूपाने अशीच एकजूट राहिल्यास पुढील काळात राज्यात वेगळे चित्र पाहायला मिळेल.
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिंदे सरकार हे लोकांना आवडलेले नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.