टोल, एल.बी.टी., मुस्लीम तसेच धनगर आरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर केलेले घुमजाव, एकनाथ खडसे यांच्यासह काही मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिलेले आव्हान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसलेली पाने यावरून भाजपचे सरकार पहिल्या १०० दिवसांमध्ये अपयशी ठरल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. या सरकारचे अस्तित्वच जाणवत नाही, अशी टीकाही केली आहे.
आश्वासनांची १०० दिवसांमध्ये पूर्तता करणे शक्य नसले तरी त्या दृष्टीने वाटचाल होणे आवश्यक होते. पण दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात सरकारची पावले पडल्याचा आरोप काँग्रेसने ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ या पुस्तिकेच्या माध्यमातून केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. सरकार जनतेच्या हिताच्या विरोधात निर्णय घेत असून त्याची माहिती पुस्तिकेतून देण्यात आल्याची माहिती सरचिटणीस संजय खोडके यांनी दिली.
पहिल्या १०० दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नसल्याचे चित्र समोर आले. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी लपून राहिलेली नाही.त्यांचा विरोध डावलून खात्याचा सचिव बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी काळा पैसा आणू नये, असा सल्ला रामदास कदम यांनी दिला. म्हणजे काळा पैसा मुख्यमंत्री स्वीकारतात का, असा प्रश्न निर्माण होतो, असा आक्षेप ठाकरे यांनी घेतला.