मुंबई : काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक लाभाचे आरोप केल्याने चर्चेत आलेल्या फ्रान्समधील सिस्ट्रा कंपनीवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेच्या कामादरम्यान भिवंडी येथे मंगळवारी दुर्घटना घडली.

रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी सळई शिरली आणि तो गंभीर जखमी झाला. अजूनही त्यांची प्रकृती नाजूक आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एमएमआरडीएने कंत्राटादारासह या मार्गिकेच्या सल्लागारावरही ठपका ठेवला आहे. कंत्राटदाराला ५० लाख रुपये, तर सिस्ट्रा कंपनीला पाच लाख रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. त्याचवेळी या दुर्घटनेच्या चौकशीची जबाबदारी ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेच्या सल्लागार समितीवर सोपविण्यात आली असून एका स्वतंत्र समितीच्या माध्यमातून चौकशी केली जाता आहे.

एमएमआरडीएने ‘मेट्रो ५’ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी दुपारी कामादरम्यान धामणकर नाका येथून विठ्ठल नगरच्या दिशेने जाणाऱ्या एका रिक्षातील प्रवासाच्या डोक्यात लोखंडी सळई शिरली आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. सोनू अली रमजान अली शेख असे या प्रवाशाचे नाव असून तो २२ वर्षांचा आहे. या प्रवाशाला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, त्याच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रियाही करण्यात आली. या दुर्घटनेची दखल घेत एमएमआरडीएने कंत्राटदार मे. अफकाॅन्स कंपनीला ५० लाख रुपये दंड ठोठावला. त्याचवेळी मेट्रो प्रकल्पाच्या कामात सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सल्लागार कंपनीची असते. काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, काम करताना कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी कशी घ्यावी या सर्व गोष्टींची जबाबदारी सल्लागार म्हणून सिस्ट्रावर आहे.

यात सिस्ट्रा कमी पडल्याचा ठपका ठेवण्यात आला असून सिस्ट्रावरही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीतील सूत्रांनी दिली. सिस्ट्रा कंपनीला पाच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर कंत्राटदारासह याप्रकरणी सिस्ट्राचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे चौकशीचा अहवाल काय येतो आणि त्यानंतर एमएमआरडीएकडून काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मात्र दंडात्मक कारवाई केल्यामुळे सिस्ट्रा पुन्हा चर्चेत आली आहे.