मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अंधेरी पश्चिम परिसरात विकसित केलेल्या क्रीडा संकुलातील क्रिकेटच्या मैदानात कोणतीही परवानगी न घेता खेळपट्टी विकसित केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या दुय्यम अभियंत्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या प्रकारामुळे मुंबई महानगरपालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयातील अधिकारी आणि अभियंत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अंधेरी (पश्चिम) परिसरात २०२० मध्ये क्रीडा संकुल विकसित केले असून गेली दोन वर्षे हे क्रीडा संकुल उद््घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या क्रीडा संकुलात क्रिकेट मैदान, सायकल मार्गिका, धावण्यासाठी मार्गिका, दोन टेनिस कोर्ट, एक बास्केटबॉल कोर्ट, दोन व्हॉलीबॉल कोर्ट, एक कबड्डी कोर्ट, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी स्वतंत्र जागा, खुली व्यायामशाळा, दर्शनी गॅलरी, प्रशासकीय कार्यालय इत्यादी सुविधा विकसित करण्यात आल्या. दोन वर्षे बंद असलेल्या या क्रीडा संकुलात किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मैदानातील किरकोळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा >>> राज्यातील व्यपगत प्रकल्पांची संख्या वाढतीच; २०२३ मध्ये आतापर्यंत १७०२ प्रकल्प व्यपगत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यानच्या काळात या संकुलातील क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी उद्यान विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याची बाब उघडकीस झाली होती. हे काम के-पश्चिम विभागातील इमारत आणि कारखाने विभागातील प्रभारी सहाय्यक अभियंता (दुय्यम अभियंता) सोमेश शिंदे करीत असल्याचे निदर्शनास आले. गेल्या काही महिन्यांमध्ये याप्रकरणावरून विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला आहे. दरम्यान, क्रिकेटच्या मैदानातील खेळपट्टीची दुरुस्ती हा क्रीडा संकुलातील किरकोळ डागडुजीचा भाग आहे, असे शिंदे यांचे म्हणणे आहे. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आता शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.