नेहरू-गांधी कुटुंबीयांशी संलग्न असलेल्या असोसिएट जनरल्स लि. कंपनीच्या नॅशनल हेरॉल्डला वितरित झालेल्या वांद्रे येथील भूखंडावर ग्रंथालय तसेच राज्यातील एका बडय़ा सहकारी बँकेचे मुख्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती उघड झाली आहे.
गेली ३० वर्षे विनावापर पडून असलेला हा भूखंड विकसित करण्यासाठी स्वरूप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजशी करार करण्यात आल्याचेही माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे.
स्वरूप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने ३ डिसेंबर २००३ मध्ये एका पत्राद्वारे उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना हा भूखंड विकसित करण्यासाठी असोसिएट जनरल्स कंपनीशी करारनामा करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या करारनाम्यानुसार या भूखंडाबाबत थकीत असलेली रक्कम भरण्याची आपली तयारी आहे.
यापोटी १० लाख रुपयांचा धनादेशही कंपनीने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता, परंतु तो स्वीकारण्यात आला नाही. उलटपक्षी ९९ लाख ७१ हजार ८९४ रुपये भरण्याचे पत्र ५ फेब्रुवारी २००५ मध्ये या कंपनीला पाठविण्यात आले होते. त्यानंतर या फाइलवर काहीही कारवाई झालेली नाही, असे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
हा भूखंड ३० वर्षे विनावापर पडून आहे तसेच ज्यासाठी हा भूखंड वितरित करण्यात आला होता त्याऐवजी अन्य कंपनीशी करारनामा करून अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.