सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सेवाभाव वृत्तीने चालणारा कारभार लक्षात घेऊन १००पेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक आयोगाच्या कचाटय़ातून लवकरच सुटका होणार आहे. याबाबत सरकारने गठित केलेल्या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला असून त्यानुसार सहकार कायद्यात गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच १०० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांना आयोगाऐवजी सर्वसाधारण सभेतच कार्यकारिणीची निवडणूक घेण्याचे अधिकार देण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहकारी संस्थांना अधिक स्वायत्तता आणि स्थैर्य देण्यासाठी केंद्र सरकारने ९७ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सहकार कायद्यात मोठय़ा प्रमाणात सुधारणा केल्यानंतर राज्य सरकारनेही सन १९६० सहकार कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. मात्र नव्या नियमावलीत सर्वच सहकारी संस्थांना एकाच नियमामध्ये अडकविण्यात आले. याचा सर्वाधिक फटका गृहनिर्माण संस्थांना होत आहे. साखर कारखाने किंवा सहकारी बँका यांचा उद्देश व्यावसायिक असतो. तर गृहनिर्माण संस्था केवळ सेवाभावी वृत्तीने कार्यरत असतात. त्यात कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन नसतो. त्यामुळे सहकार कायद्यातील जाचक तरतुदींमधून गृहनिर्माण संस्थांना वगळावे किंवा दिलासा देणाऱ्या कायदेशीर तरतुदी करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार सध्याच्या सहकार कायद्यात गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करण्यासाठी विभागाचे सहनिबंधक संदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, मुंबई गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या अध्यक्षा छाया आजगावकर आदींची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच शासनास सादर केला असून त्यात गृहनिर्माण संस्थांना दिलासा देणाऱ्या अनेक शिफारसी समितीने केल्याचे समजते. समितीने २०० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांची सहकार निवडणूक  प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातून सुटका करण्यात यावी आणि त्यांना आयोगाच्या केवळ देखरेखीखाली निवडणुका घेण्याची मुभा द्यावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cooperative housing society election
First published on: 06-06-2018 at 03:09 IST