संदीप आचार्य

लघुशंकेस जायचंय, पण जाता येत नाही. भूक लागलीय, पण खाता येत नाही, पाणीही पिता येत नाही.. हे सारे एकवेळ ठीक आहे. पण करोना संरक्षित पोशाख (करोना किट) एकदा का अंगावर चढवला की एखाद्या भट्टीत असल्याप्रमाणे आम्ही अक्षरश: भाजून निघतो. आत घामाच्या धारा वाहात असतात आणि समोर रुग्णावर उपचार सुरू असतात.. ही भावना व्यक्त केली आहे, केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर दीपक मुंडे यांनी.

मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव तसेच सेव्हन हिल व कस्तुरबा रुग्णालयात करोनाशी थेट लढणाऱ्या प्रत्येक डॉक्टरची व्यथा अशीच आहे. ‘करोनाचे रुग्ण ज्या विभागात अथवा अतिदक्षता विभागात असतात तेथे वातानुकूलित यंत्रणा (एसी) बंद ठेवावी लागते. अन्यथा साथ बाहेर पसरू शकते. विचार करा अशा अवस्थेत रात्री आम्ही सारे डॉक्टर बारा-बारा तास कसे काम करत असू’, असा सवाल डॉ. मुंडे यांनी एका खुल्या पत्राद्वारे केला आहे.

‘लोकसत्ता’ शी बोलताना डॉ. मुंडे म्हणाले, गेले महिनाभर मी करोना रुग्णांच्या विभागात कधी दिवसा आठ तास, तर रात्री बारा तास काम करीत आहे. आज महिन्याभरानंतर मला सुट्टी मिळाली आहे. एका भयंकर शारीरिक व मानसिक विवंचनेतून आम्ही सारे डॉक्टर जात आहोत. तरीही या आणीबाणीच्या काळात अहोरात्र सेवा बजावत आहोत. माध्यमातून येणाऱ्या काही अतिरंजित बातम्यांमुळे एकीकडे आमच्या घरचे लोक हवालदिल आहेत तर दुसरीकडे करोना संरक्षित पोशाख घातल्यानंतरच्या यातना न सांगता येणाऱ्या आहेत. आम्ही बहुतेक डॉक्टर २४ ते ३० वयोगटातील आहोत. पण आमच्यातील वयस्कर तसेच मधुमेह आदी आजार असणाऱ्या परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाची कल्पनाही करवत नाही, असे डॉ. मुंडे म्हणाले.

करोना संरक्षित पोशाख घालणे व काढणे हेही खूप काळजीपूर्वक करावे लागते. चेहऱ्याला एन – ९५ चा मास्क, त्यावर तीन थराचा सर्जिकल मास्क आणि त्यावर चेहरा झाकणारे प्लास्टिकचे कव्हर यामुळे श्वासही नीट घेता येत नाही. प्रचंड गुदमरल्यासारखे होते. श्वास सोडण्याच्या प्रक्रियेत गॉगलवर धुके जमा होते. त्यामुळे समोर अंधूक दिसते. याही परिस्थितीत सतत सावध राहून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संभाव्य धोका समजावून पटापट उपचार करावे लागतात. अनेकदा ओरडून बोलले तरच रुग्णांपर्यंत आमचा आवाज पोहोचतो. ओरडून बोलावे लागत असल्याने घसा पार कोरडा पडतो, पण पाणीही पिता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी आमची परिस्थिती असून न थकता रुग्णसेवा म्हणून आम्ही जीवनमरणाची लढाई लढत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

‘डॉक्टरांकडून जिवाची बाजी’ : केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनीही निवासी डॉक्टर, परिचारिका तसेच करोनाच्या लढाईतील प्रत्येक आरोग्य सैनिक हा कौतुकास पात्र असल्याचे सांगितले. करोना किट घालून आठ-आठ तास काम करणे हे एक आव्हान आहे. करोनाची साथ पसरू नये यासाठी वातानुकूलन यंत्रणा बंद ठेवावी लागते आणि अनेक थरांचा हा पोशाख घालून अंगातून घामाच्या धारा वाहत असताना आमचे डॉक्टर करोना रुग्णांना बरे करण्यासाठी झटत असतात. ही लढाई रुग्ण सेवेसाठी आहे आणि पालिकेचे डॉक्टर व परिचारिका जिवाची बाजी लावून ती लढत आहेत, अशा शब्दात कौतुक केले.