मुंबई: करोना संसर्गाचा नवीन उपप्रकार आढळला असून दीपावली सारख्या सण उत्सवाच्या कालावधीत अधिक संख्येने होणाऱ्या भेटीगाठी, कार्यक्रम लक्षात घेता नागरिकांनी संसर्ग प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अहवालानुसार ओमिक्रोन विषाणूचे नवीन उपप्रकार आढळून आले आहेत. हे नवीन उपप्रकार जुन्या ओमिक्रॉनच्या उपप्रकारांपेक्षा अधिक प्रमाणात संसर्गजन्य ठरू शकतात, असे आढळून आले आहे. करोनाच्या रुग्णांची ऑक्टोबर २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात वाढलेली संख्या आणि जवळ आलेला सणांचा हंगाम लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. सणासुदीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येतात. कार्यक्रम, सोहळे, भेटीगाठी, मेळावे, जत्रा यासह बंदिस्त आणि हवेशीर नसलेल्या ठिकाणी देखील नागरिक एकत्र आल्यानंतर कोविड सुरक्षित वर्तनाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

ही काळजी घ्यावी

ज्या नागरिकांनी अद्यापही कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल किंवा रोगप्रतिकारक शक्तीला धोका पोहोचणार असेल तर लसीची वर्धक मात्रा घेतल्यास विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होवू शकते.

घरामध्ये हवा खेळती ठेवा, कारण बंद खोल्यांमध्ये विषाणू फैलावण्यास मदत होते.

लक्षणे असलेल्या रुग्णांशी नजीकचा संपर्क टाळावा.

वारंवार हात स्वच्छ धुवा.

शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमालाचा वापर करा.

संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी (मास्क) घालणे आवश्यक आहे.

लक्षणे दिसू लागताच कोविडची चाचणी करुन घेणे अतिशय गरजेचे आहे. कोविड चाचणीच्या परिणामांची वाट न पाहता, खबरदारी म्हणून स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा, जेणेकरून संक्रमणाची साखळी तोडता येईल आणि इतरांना संसर्ग होणार नाही.