सोमवारी दिवसभरात ४४ हजार जणांना मात्रा; प्रत्येक केंद्राला ३०० कुप्यांचा पुरवठा

मुंबई : केंद्र सरकारने आखलेल्या नव्या धोरणानुसार १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू झाल्यामुळे तसेच लशीचा पुरेसा पुरवठा होऊ लागल्यामुळे मुंबईत लसीकरण मोहिमेने चांगला वेग धरला आहे. पालिकेच्या केंद्रांवर सोमवारी दिवसभरात ४४ हजार ३८४ जणांना मात्रा देण्यात आली असून यामध्ये जवळपास निम्मे नागरिक १८ ते ४४ या वयोगटातील आहेत. दरम्यान, महापालिकेने आता प्रत्येक लसीकरण केंद्रावर लशीच्या ३०० कुप्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे दररोज अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार, लशींचा ७५ टक्के साठा घेतल्यामुळे केंद्राकडून होणाऱ्या लशींच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात सुमारे सव्वा लाख लशींचा साठा मुंबईला प्राप्त झाला आहे. त्यामुळे जवळपास दोन लाख लशींचा साठा सध्या पालिके कडे सध्या झाला असून वेगाने लसीकरण करण्यासाठी केंद्रातील लशींचा साठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही छोटी केंद्रे वगळता सर्व केंद्रांना दरदिवशी ३०० लशींच्या मात्रा दिल्या जातील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

शहरातील   मुंबई महापालिकेच्या केंद्रांवर सोमवारी ४४,३८४ जणांचे लसीकरण झाले. यात २२,७५१ नागरिक १८ ते ४४ वयोगटातील तर २५३ परदेशी जाणारे विद्यार्थी आणि ११ स्तनदा मातांचा समावेश आहे. सरकारी केंद्रांमध्ये सोमवारी ४८२४ जणांचे लसीकरण सोमवारी झाले असून यात १८ ते ४४ वयोगटातील २८२८ नागरिकांनी लस घेतली आहे.

पालिका आणि सरकारी केंद्रांतील लसीकरण वाढल्यामुळे शहरातील एकूण लसीकरणाची संख्या सोमवारी पुन्हा एकदा एक लाखाच्या वर गेली आहे. सोमवारी शहरात १ लाख ८ हजार १४८ जणांचे लसीकरण केले गेले. दरम्यान मंगळवारी देखील अनेक केंद्रावर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांची गर्दी झाली होती.

खासगी लसीकरण अधिकच

खासगी केंद्रांवरील लसीकरण अजूनही पालिकेच्या तुलनेत अधिक असून सोमवारी खासगी केंद्रांमध्ये ५८,९४० जणांचे लसीकरण झाले. यात सर्वाधिक ४९,७३७ हे १८ ते ४४ वयोगटातील होते. खासगी केंद्रांमध्ये ‘स्पुटनिक’ या लशीचे लसीकरण सुरू झाले असून आत्तापर्यंत ९१० जणांनी या लशीची पहिली मात्रा घेतली आहे.

थेट लसीकरण सुविधा

शहरात शारीरिक आणि मानसिकदृष्टया अपंग असलेले, परदेशात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जाणारे आणि स्तनदा माता यांच्या लसीकरणासाठी कस्तुरबा, केईएम, सेव्हन हिल्स, कुपर, शताब्दी रुग्णालय (गोवंडी), दहिसर जम्बो रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय येथे थेट लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. अपंग व्यक्ती आणि स्तनदा मातांना पहिली मात्रा तर परदेशात जाणाऱ्यांसाठी दुसरी मात्रा थेट घेता येईल.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona positive patient corona vaccine in mumbai akp
First published on: 23-06-2021 at 01:19 IST