मुंबई : शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालक-विद्यार्थ्यांनी गेल्या तीन आठवड्यांत दिलेला प्रतिसाद पाहता राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याची भूमिका राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत मांडली. त्यामुळे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि तज्ज्ञांच्या कृती गटाशी चर्चा करून दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे  गायकवाड यांनी जाहीर के ले.

राज्यात ४ ऑक्टोबरला शाळा सुरू झाल्यानंतर आता तीन आठवडे उलटल्याने पालक-विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, जिल्हा परिषद शाळांमधील परिस्थिती यांचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. शाळा सुरू झाल्यानंतर पालक-विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची व बाकीचे वर्गही सुरू करण्याबाबत विचारणा होत असल्याची माहिती देत पहिली ते चौथीच्या शाळाही लवकर सुरू करण्याची भूमिका बहुतांश जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वर्षा गायकवाड यांच्यासमोर मांडली.

पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत सर्वच अधिकाऱ्यांनी भर दिल्याने आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर शाळा पुन्हा सुरू होतील, असे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने ‘आदर्श शाळा‘ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्तिश: लक्ष घालण्याचे आदेशही वर्षा गायकवाड यांनी दिले.