|| शैलजा तिवले

राज्यात धोकादायक स्थितीतून अंतर्जन्य स्थितीकडे प्रवास : तज्ज्ञांचा दावा

मुंबई : मुंबईसह राज्य आता करोना साथीच्या विळख्यातून हळूहळू बाहेर पडत आहे. करोना मर्यादित प्रमाणात दीर्घकाळ राहण्याच्या स्थितीत म्हणजेच अंतर्जन्य (एन्डेमिक) दिशेने जात असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. म्हणजेच करोना धोक्याच्या पातळीवरून आता नियंत्रणात येत असल्याचे आशादायी चित्र आहे.

राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. चाचण्या वाढविल्यानंतर बाधितांची संख्या वाढते आणि चाचण्या कमी केल्या की बाधितांची संख्या घटते. मात्र, बाधितांचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे आता साथीच्या धोकादायक टप्प्यातून अंतर्जन्य स्थितीकडे आपण जात आहोत, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

मुंबईत सध्या जवळपास सर्वच भागांमध्ये कमी प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले असून, ६० ते ७० टक्के समूह प्रतिकारशक्ती नक्कीच निर्माण झाली आहे. राज्यातही अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. तसेच राज्यात सुमारे ७० टक्के नागरिकांना लशीची पहिली तर सुमारे ३० टक्क्यांहून अधिक नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. मृत्यूचे प्रमाणही तुलनेने कमी झाले आहे. मृतांमध्येही दीर्घकालीन आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचाच प्रामुख्याने समावेश आहे. करोना आता डेंग्यू, स्वाइन फ्लूप्रमाणे आणखी काही काळ आपल्यासोबत नक्कीच राहील. परंतु त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

आजाराच्या अंतर्जन्य स्थितीचेही तीव्र, सौम्य असे प्रकार आहेत. ज्या भागांमध्ये आजारांचे प्रमाण कमी होत असले तरी त्याची तीव्रता अधिक असते, तेथे ‘हाय एन्डेमिक’ आणि तीव्रतेचे प्रमाण कमी असल्यास ‘लो एन्डेमिक’ असे म्हणतात. करोना साथ गेल्या दीड वर्षापासून असून याची तीव्रता आणि प्रसाराचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कमी होत आहे, परंतु दीर्घकाळ राहणार आहे, यालाच एन्डेमिक स्थितीच्या दिशेने जात आहोत असे म्हणता येईल, असे साथरोगतज्ज्ञ  आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी संचालक डॉ. प्रकाश डोके यांनी सांगितले.

देशात गेल्या काही दिवसांपासून संसर्गाचा प्रादुर्भाव ज्या रीतीने कमी होत आहे, त्या दृष्टीने आपण अंशत: अंतर्जन्यच्या दिशेने जात आहोत. काही भागांमध्ये संसर्गाचा उद्रेक मात्र पुढील काही काळ होत राहणार आहे. परंतु, संसर्गाची पुन्हा बाधा किंवा प्रसाराचा वेग तुलनेने नक्कीच कमी असेल, असे मत साथरोगतज्ज्ञ डॉ. टी. सुंदरामन यांनी व्यक्त केले.

अंतर्जन्य स्थिती म्हणजे?

एखाद्या आजाराचा उद्रेक जगभरात किंवा मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याला साथरोग (पॅन्डेमिक) म्हटले जाते. या उलट आजाराचे एखाद्या भागात किंवा प्रदेशात कमी प्रमाणात आणि दीर्घकाळ वास्तव्य असण्याच्या स्थितीला अंतर्जन्य (एन्डेमिक) म्हटले जाते.       

उत्परिवर्तनाचे प्रमाण कमी

‘डेल्टा प्लस’ हा करोनाचा उत्परिवर्तित विषाणू ‘डेल्टा’प्रमाणेच घातक असेल का, अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु ‘डेल्टा’च्या तुलनेत त्याचा प्रसार आणि तीव्रता कमी आहे. करोनाची साथ आल्यापासून वेगाने विषाणूची विविध उत्परिवर्तित रूपे आढळली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून करोना उत्परिवर्तित होण्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढली तरी किंवा तिसरी लाट आली तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी असेल, असे मत डॉ. डोके यांनी व्यक्त केले.     

…तरी काळजी आवश्यक  करोनाचा अंतर्जन्य स्थितीकडे प्रवास सुरू असला तरी मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर या करोना प्रतिबंधात्मक नियमांचा वापर करत किमान मार्च- एप्रिलपर्यंत काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. सुपे यांनी अधोरेखित केले.

घसरता रुग्णआलेख

राज्यात ऑगस्टमध्ये प्रतिदिन सुमारे पाच ते सहा हजार रुग्ण आढळत होते. सप्टेंबरपासून यात घसरण होत दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे साडेतीन हजारापर्यंत खाली आली. रुग्णसंख्येतील ही घट कायम राहिली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे अडीच हजारापर्यंत कमी झाली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात तर दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घसरून सुमारे दीड हजारांपर्यंत खाली आला.