मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला व महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी अधिकाधिक सुविधा वाढवण्यासह करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लोकांना सहभागी करून घेण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांना केलं. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत उभारण्यात आलेल्या सुविधांचाही उल्लेख बैठकीत केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे झालेल्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आज मार्चपासून जुलैपर्यंतच्या कालावधीत आपण जम्बो सुविधा उभारण्यावर भर दिला. आज मुंबईमध्ये ज्या रीतीने या सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत तशा त्या महानगर क्षेत्रातही होणे अपेक्षित होते आणि वारंवार तशा सूचना देण्यात आल्या होत्या, पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरु करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांची देखील मदत घ्या. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय, पिण्याचे पाणी या सोयी आहेत. आयसीयू, डायलेसिस सुविधा आहेत. पालिकांनी आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले

शहरांत करोना दक्षता समित्या नेमा

“स्वातंत्र्यांच्या काळात देशभर जे वातावरण निर्माण झाले ते नागरिकांच्या, जनतेच्या सहभागामुळे. करोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, कॉलनीजमध्ये नागरिकांच्या करोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था, युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का, तसेच त्यांची ऑक्सिजन पातळीबरोबर आहे का, परिसरात कुणाला काही आजार आहेत का, स्वच्छता नियमित केली जाते का, लोक मास्क घालतात का या तसेच इतर अनेक बाबतीत या नागरिकांच्या समित्याची आपणास मदत होईल. मुंबईत २०१० मध्ये मलेरिया, डेंग्यूच्यावेळी मुंबईच्या वस्त्यावस्त्यांत लोकांच्या मदतीने फवारणी केली होती. त्याप्रमाणे मिशन मोडवर हे काम सर्वांनी करावे. लोकांमध्ये जिद्द निर्माण करा म्हणजे ही लढाई लढणे सोपे जाईल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus cm uddhav thackeray took review covid situation in thane district bmh
First published on: 09-07-2020 at 15:27 IST