मुख्यमंत्र्यांचे संकेत; दोन-तीन दिवसांत निर्णयाची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता संसर्ग साखळी तोडण्याची गरज असून, त्यासाठी काही दिवसांसाठी तरी कठोर निर्बंध लागू करावेच लागतील. मात्र, जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी पूर्वसूचना देऊन निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवस टाळेबंदी अटळ असल्याचे स्पष्ट संके त शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत दिले. दोन-तीन दिवसांत याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्वच भागांत करोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने आरोग्यसुविधा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. उपमुख्यमंत्री  अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी बैठकीत सहभागी झाले होते. प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी करोनास्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे, त्याची माहिती दिली. टाळेबंदीसारख्या कडक र्निबधांची गरज असून, अन्यथा १५ एप्रिलनंतर परिस्थिती कठीण होईल, याकडे कु ंटे यांनी सर्वाचे लक्ष वेधले.

करोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना, पण कठोर निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्यास प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कठोर निर्बंध लागू करताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये, हीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरूर विचार केला जाईल. पण, दररोज झपाटय़ाने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे, अशा शब्दांत टाळेबंदी अटळ असल्याचे संके त ठाकरे यांनी दिले. तसेच सर्वानुमते निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी सर्व पक्षांना के ले.

आपण सर्वसमावेशक नियोजन करू. तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू. पण आता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीत लोक घरी होते. त्यामुळे रुग्णशोध मोहीम सोपी होती. आता रुग्णशोध मोहिमेत अडचणी येत आहेत. एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. इंग्लंडमध्ये दोन महिने कडक टाळेबंदी करून त्या काळात मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित करण्यात आले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट के ले.

आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. एका बाजूला जनभावना आहे, पण दुसऱ्या बाजूला करोनाचा उद्रेक आहे. अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर सोसावीच लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृती गटाच्या तज्ज्ञांचे म्हणणेही आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे. शुक्रवारी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे, असे ठाकरे यांनी नमूद के ले.

रेमडीसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पाउले उचलावी लागतील. तसेच या औषधाचा अतिरेकही थांबावा लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. टाळेबंदी अचानक लागू करू नये. तत्पूर्वी सामान्य जनतेला दोन-तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी सूचना अशोक चव्हाण यांनी के ली.  करोना प्रतिबंधासाठी राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर के ले.

सुवर्णमध्य साधणारा निर्णय घ्यावा :  फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सहकार्याचे आश्वासन दिले. मात्र, चाचण्यांचे अहवाल वेळेत येत नसल्याने मधल्या काळात संबंधित रुग्ण इतरांना संसर्ग होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अहवाल वेळेत यावेत, यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी फडणवीस यांनी के ली. रेमडीसिवीर उपलब्धतेसाठी तातडीने प्रयत्न करण्याची आणि ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी काटेकोर नियोजनाची गरजही फडणवीस यांनी व्यक्त के ली.टाळेबंदीसाठी निर्बंध लागू करताना काय सुरू ठेवता येईल, याचाही विचार करावा आणि त्यांचा आराखडा सर्वासमोर सादर  करून मगच निर्णय घ्यावा, अशा मागण्याही फडणवीस यांनी के ल्या. राजकारण करू नका, हा सल्ला आम्हाला देताना सत्तापक्षातील मंत्री रोज मुलाखती देत सुटत असतील, तर आमच्याकडून एकतर्फी सहकार्याची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही, असा टोला फडणवीस यांनी राजेश टोपे यांचे नाव न घेता लगावला. जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय असावा, अशी आमची भूमिका आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

 

पुण्यात ‘काळा दिवस’

पुणे : रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका नाहीत, खाटांचा अभाव, गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग आणि कृत्रिम श्वसनयंत्रणासज्ज खाटांचा तुटवडा, रेमडेसिविरसाठी वणवण, आणि लशींचा अपुरा साठा, असे चित्र शनिवारी पुण्यात पाहायला मिळाले. त्यामुळे संचारबंदीचा पहिलाच दिवस पुणेकरांसाठी काळा दिवस ठरला.

केंद्राला संदेश

महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीमुळेच करोनाविरुद्धच्या देशव्यापी लढय़ाला सुरूंग लागला, अशी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेली टीका आणि राज्य सरकार गंभीर नाही, असे दिल्ली व राज्यात निर्माण झालेले चित्र या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करून करोनाची साखळी तोडण्यावर राज्य सरकारचा भर आहे.  पुढील आठ ते दहा दिवस कठोर निर्बंध लागू करून केंद्राला आपल्याकडे बोट दाखविण्याची संधी द्यायची नाही, अशी रणनीती मुख्यमंत्र्यांनी आखली आहे. करोना रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू करून लशींच्या पुरेशा मात्रांची मागणी जोरकसपणे मांडण्याची सरकारची भूमिका आहे.

कृती दलाची आज बैठक

मुख्यमंत्र्यांनी आज, रविवारी करोना कृती दलाच्या तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. त्यात टाळेबंदी लागू करायची का, यावर चर्चा करण्यात येईल. तसेच टाळेबंदीबाबत दोन दिवसांत कृती आराखडा तयार करण्यात येईल.

दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट

मुंबई : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यात शनिवारी दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट नोंदविण्यात आली. राज्यात गेल्या २४ तासांत ५५,४११ नवे रुग्ण आढळले, तर ३०९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ५ लाख ३६ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी एक लाखापेक्षा अधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्य़ातील आहेत. मुंबई ८९,७०७, ठाणे जिल्हा ७१,०६१, नाशिक ३२,८११, नागपूर ५६,६९८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये नवा उच्चांक : महाराष्ट्रापाठोपाठ अन्य राज्यांतही करोनाचा वेगाने फैलाव होत आहे. गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशात १२,७८७ रुग्ण आढळले. राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा हा उच्चांक आहे. देशात दिवसभरात १,४५,३८४ रुग्णांची नोंद झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus patient in maharashtra chief minister uddhav balasaheb thackeray akp
First published on: 11-04-2021 at 01:57 IST