या अधिवेशनात विरोधकांनी सरकारची चौफेर कोंडी केली. मात्र भ्रष्टाचाराचे बिंग फुटू नये म्हणून आमदारांना निलंबित करून विरोधकांची सातत्याने मुस्कटदाबी करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केला. तसेच आदर्श अहवाल सादर करण्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणण्याची घोषणाही त्यांनी केली.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगीत झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना खडसे यांनी हा आरोप केला. त्यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. अधिवेशनात विरोधकांची मुस्कटदाबीच झाली. विकास निधीचे वाटप करताना विरोधकांना डावलले. मात्र आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विरोधी आमदारांना तीन कोटी निधी मान्य करण्यात आला. तसेच वक्फ बोर्ड घोटाळ्याबाबत केलेल्या पाठपुराव्यांतर हा अहवाल जाहीर करणे सरकाने मान्य केल्याचे खडसे म्हणाले. मात्र आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल सभागृहात मांडण्याचे मान्य करूनही मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात  हक्कभंग आणणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले. तर या अहवालात केंद्रीय मंत्र्यावर ठपका ठेवण्यात आल्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार अडचणीत येऊ नये म्हणून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर हा अहवाल मांडण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला. विशेष अधिवेशन बोलावून हा अहवाल चर्चेला नाही आणला तर न्यायालायतही दाद मागू, असेही तावडे यांनी सांगितले. तर या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या तोंडाला पाणे पुसल्याचा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला.