शुल्कात दहापट वाढ; पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी

देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (आयआयटी) पदव्युत्तर शिक्षण घेणे पुढील वर्षांपासून महागणार असून दहापटीने शुल्क वाढवण्यात आले आहे. आयआयटीचे एमटेकचे शुल्क आता साधारण दोन लाख रुपयांच्या घरात जाणार आहे.

आयआयटी काऊन्सिलच्या बैठकीत शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील आयआयटीमध्ये एम.टेकचे शैक्षणिक शुल्क सध्या पाच ते दहा हजार आहे. शैक्षणिक शुल्कामध्ये इतर विविध शुल्क मिळून ते वीस हजारांपर्यंत जाते. मात्र आता दोन लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२०) हा निर्णय अमलात येणार आहे. त्यामुळे आता आयआयटीत पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडे फक्त गुणवत्ता असणे पुरेसे नाही तर आर्थिक पाठबळही आवश्यक ठरणार आहे.

विद्यावेतनही बंद?

एकीकडे शुल्क वाढवताना पदव्युत्तर विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विद्यावेतनही बंद करण्याबाबत प्रस्ताव आयआयटी काऊन्सिलसमोर मांडण्यात आला आहे. सध्या ‘गेट’च्या माध्यमातून आयआयटीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला १२ हजार ४०० रुपये विद्यावेतन देण्यात येते.

मात्र पुढील वर्षांपासून हे विद्यावेतन बंद करण्याचा प्रस्ताव आहे. त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना काही रक्कम देऊन किंवा कर्ज देऊन मदत करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सरसकट विद्यावेतन बंद करणे आणि शुल्कातील वाढ यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

प्राध्यापकांचे मूल्यांकन

कंत्राटी प्राध्यापकांचे दर पाच वर्षांनी मूल्यांकन केले जाणार आहे. ज्या प्राध्यापकांना या मूल्यांकनाची चांगली श्रेणी मिळणार नाही त्यांचे कंत्राट पाच वर्षांनंतर रद्द होऊ शकणार आहे. चांगली कामगिरी असणाऱ्या प्राध्यापकांना नियमित करण्यात येणार आहे. आयआयटीतील सुधारणांबाबत नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींनुसार हे बदल करण्यात येणार आहेत.