शिवकालीन अंगरखा, नाना शंकरशेट पगडी

मुंबई : मुंबई विद्यापीठाने दीक्षांत समारंभाचा पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता पैठणी किनार असलेला शिवकालीन अंगरखा, मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट पगडी, असा दीक्षांत समारंभाचा पोशाख असेल. नवा पोशाख शौर्य, सौंदर्य आणि विद्वत्तेचे प्रतीक आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. गेल्या वर्षी पोशाख बदलण्याचा विचार पुढे आला. नव्या पोशाखासाठी प्रा. एम. डी. तेली, प्रा. अरमैती शुक्ला आणि अ ना राव या तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली.

भारतीय संस्कृती आणि परंपरेला साजेल, अशा पोशाखाची रचना करण्यासाठी समितीने अभ्यास केला. समितीने अभ्यासांती निश्चित केलेल्या नव्या पोशाखाला बुधवारी व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली.

वैशिष्टय़े..

विशेष बाब म्हणजे नव्या पोशाखासाठी खादीचा वापर करण्यात येईल. शिष्टाचारानुसार विविध रंगांचे पोशाख शिवण्यात येणार आहेत. सर्वसमावेशकतेसोबत संस्कृती, परंपरेचा उत्कृष्ट मिलाफ दीक्षांत समारंभाच्या नव्या पोशाखात दिसेल, असा विश्वासही कुलगुरूंनी व्यक्त केला.