मुंबई : दहीहंडीला ‘साहसी खेळा’चा दर्जा दिल्यामुळे हा खेळ ऑलंपिकमध्ये पोहोचेल आणि देशाचे नाव जागतिक पातळीवर जाईल, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी केला. या खेळासाठी पाच टक्के आरक्षण दिलेले नाही तर खेळाडमूंसाठी जे पाच टक्के आरक्षण आहे, त्यात कबड्डी, खोखोप्रमाणेच दहीहंडीचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडू आणि राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देऊन त्यासाठी सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्याच्या एकनाथ शिंदे- फडणवीस सरकारच्या निर्णयावर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. क्रीडा, राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतून या निर्णयास विरोध होत आहे. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या सरकारच्या विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बचावासाठी उदय सामंत आणि आमदार प्रताप सरनाईक पुढे आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहीहंडी फोडणाऱ्या गोंविंदासाठी नोकरीत आरक्षण जाहीर करण्यात आल्याने काहींचा गैरसमज झाला आाहे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून दहीहंडी या खेळाबाबतची नियमावली क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून क्रीडा खाते तयार करणार आहे. ती तयार करताना वयोगट, शिक्षण, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा याचा विचार करण्यात येईल. त्यामुळे शिक्षण आणि अन्य निकष पूर्ण करणाऱ्या गोविंदाना अन्य खेळाडूंप्रमाणे नोकरी मिळेल असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.