सहाय्यक पोलीस आयुक्त या अधिकाराच्या पदावर कार्यरत असलेले विजय बाळकृष्ण बागवे एक सफाई कामगारही आहेत. सफाई कामगार म्हणून त्यांना वेतनही मिळते. विचित्र वाटले तरी हे सत्य आहे. विशेष म्हणजे अधिकृतपणे ते त्यांच्या पत्नीकडेच पगारी नोकर म्हणून काम करतात, असेही निष्पन्न झाले आहे.
‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’चे स्वप्न साकारण्यासाठी महापालिकेने ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन योजना’ सुरू केली असून या योजनेअंतर्गत वस्त्या आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महिला बचत गटांवर सोपविण्यात आली आहे. महापालिकेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढविणाऱ्या महिला उपसंघटक वृषाली बागवे यांच्या ‘सावित्रीबाई फुले महिला बचत गटा’ला दहिसर विभागातील स्वच्छतेचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिले होते.
या बचत गटात १९ सदस्य असून त्यामध्ये वृषाली बागवे यांच्यासह बागवे कुटुंबातील सात जणांचा समावेश आहे. वृषाली बागवे यांचे पती सहाय्यक पोलीस आयुक्त विजय बाळकृष्ण बागवे यांचे नावही या कामगारांमध्ये समाविष्ट आहे.
त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खात्यावर ५६०० रुपये दरमहा जमाही होत आहेत. संतापजनक बाब म्हणजे हा सरळसरळ पालिकेला गंडा घालण्याचा प्रकार असूनही या दोन्ही ठग पतीपत्नींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.मार्च २०१२ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांच्याविरोधात वृषाली बागवे यांनी निवडणूक लढविली
होती.