मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना खाट, गादी, खुर्ची उपलब्ध करून देण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. तर घरच्या जेवणाबाबतचा निर्णय मलिक यांच्या वैद्यकीय अहवालानंतर देण्याचे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष न्यायालयासमोर सोमवारी हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडी ४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली.  मलिक यांना पाठदुखीचा त्रास असल्याने त्यांना खाट, गादी आणि खुर्ची उपलब्ध करण्याची, तर उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने कमी मीठ असलेले घरचे जेवणांची परवनगी द्यावी, अशी  मागणी मलिक यांच्यातर्फे अर्जाद्वारे करण्यात आली. न्यायालयाने त्यांची खाट, गादी आणि खुर्चीची मागणी मान्य केली.  घरच्या जेवणाबाबत वैद्यकीय अहवाल पाहून निर्णय दिला जाईल.