गिरगाव चौपाटीप्रमाणे दादर चौपाटीवरही मोठय़ा प्रमाणात गणपती विसर्जन केले जात असल्याने पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी विसर्जनादरम्यान वाहतूक कोंडी नको म्हणून यंदाही उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कमध्ये या तीन दिवशी तात्पुरता वाहनतळ उभारण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने परवानीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळेस २, ४ आणि ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणपती विसर्जनादरम्यान शिवाजी पार्कमध्ये गाडय़ा उभ्या करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. परंतु त्याला ‘वी-कॉम’ ट्रस्टतर्फे तीव्र विरोध करण्यात आला. शिवाजी पार्कवगळता परिसरातच पर्यायी जागा गाडय़ा उभ्या करण्यासाठी शोधली जाईल, असे आश्वासन पालिकेने गेल्या वर्षी दिले होते. परंतु त्यासाठी प्रयत्न न करता पुन्हा एकदा शिवाजी पार्कमध्येच गाडय़ा उभ्या करण्यास परवानगी मागण्यात येत असल्याची बाब ट्रस्टच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. न्यायालयानेही शेवटच्या क्षणी तुम्ही  परवानगी मागणारा अर्ज कसा काय करता, असा सवाल केला. मात्र ही जागा वगळता अन्यत्र जागाच उपलब्ध नसल्याचा दावा पालिकेतर्फे करण्यात आला.