scorecardresearch

मुंबईत चाचण्यांमध्ये घट ; दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत थेट ४७ हजारापर्यंत घसरण

शहरात डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून तिसरी लाट वेगाने पसरायला सुरुवात झाली

मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण जसजसे कमी होऊ लागले तसतसे चाचण्यांमध्येही मोठय़ा प्रमाणात घट होऊ लागली आहे. तिसऱ्या लाटेने उच्चांक गाठला त्यावेळी मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या ही ६८ ते ७० हजारांवर गेली होती. परंतु आता हे प्रमाण थेट ४७ हजारांपर्यंत खाली आले आहे.

शहरात डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून तिसरी लाट वेगाने पसरायला सुरुवात झाली. या काळात दैनंदिन बाधितांची संख्याही तीन ते चार दिवसांत दुप्पट होत होती. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही हळूहळू वाढून डिसेंबरच्या शेवटी दरदिवशी सुमारे ५० हजारापर्यंत गेले होते. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात तर तिसऱ्या लाटेने उच्चांक गाठला आणि दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या घरात गेली. परिणामी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्याही वेगाने वाढत गेली आणि दैनंदिन चाचण्यांची संख्या ७० हजारांच्याही वर गेली. ६ जानेवारीला शहरात ७२ हजार ४४२ चाचण्या एका दिवसांत केल्या गेल्या असून मुंबईत करोनाच्या साथीमध्ये सर्वाधिक चाचण्या या काळात केल्या गेल्या. या काळात प्रतिजन चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून दिवसभरात केलेल्या चाचण्यांमध्ये जवळपास २० हजार प्रतिजन चाचण्या केल्या जात होत्या.

जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वेगाने खाली येऊ लागला, तसा चाचण्यांचा आलेखही पुन्हा खाली आला आहे. मागील तीन ते चार दिवसांत तर शहरात दैनंदिन चाचण्यांची संख्या ४८ हजारांच्यापुढे गेलेली नाही.

शहरातील संसर्ग प्रसाराचा वेग कमी झाला असला तरी अद्याप दर दिवशी पाच हजार रुग्णांचे निदान होत आहे. त्यामुळे अजूनही चाचण्यांवर भर देणे गरजेचे आहे. तसेच यातील ज्येष्ठ नागरिक, जोखमीच्या गटातील व्यक्तींचे निदान वेळेत होणे आवश्यक असल्यामुळे चाचण्यांची संख्या कमी करणे धोकादायक ठरू शकते, असे मत कृती दलाने व्यक्त केले आहे.

चाचण्यांचे प्रमाण ५० हजारांच्या पुढे जाणे अवघड 

सध्या आंतराष्ट्रीय प्रवाशांबाबतच्या नियमावलीमध्ये बदल केले जात असून दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांनाही आता सात दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा नियम लागू केला जाणार आहे. त्यामुळे आता विमानतळावरील चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून पुढील काळात ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे प्रमाणही कमी झाले आहे. केंद्राच्या नियमावलीनुसार संपर्कातील व्यक्तींला लक्षणे असल्यास तपासणी करावी. परंतु तरीही खबरदारी म्हणून आपण सर्वाच्या चाचण्या करत आहोत. केंद्राच्या नियमावलीनुसार इतर राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या चाचण्याही करता येणार नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या चाचण्यांचे प्रमाण हे संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कमी होत जाईल. त्यामुळे दैनंदिन चाचण्यांची संख्या ५० हजारांच्या पुढे जाणे अवघड आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid 19 testing reduce in mumbai zws

ताज्या बातम्या