राज्य कृतिदलाची राज्य सरकारला सूचना

मुंबई: डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू इत्यादी पावसाळी आजारांचे प्रमाणही वाढत असून करोना आणि यांची लक्षणे समान आहेत. त्यामुळे लक्षणे दिसून आल्यावर प्राधान्याने करोनाच्या चाचणी करण्यावर भर देणे आवश्यक आहे, जेणेकरून वेळेत निदान झाल्यास उपचारासह संसर्गप्रसार रोखला जाईल, असे करोना कृतिदलाने रविवारी राज्यभरातील डॉक्टर, परिचारिका यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या वैद्यकीय परिषदेमध्ये अधोरेखित केले.

दुसऱ्या लाटेचे शेपूट आणि तिसऱ्या लाटेचा धोका या पार्श्वभूमीवर तिसरी लाट वेळीच थोपविण्यासाठी ‘माझा डॉक्टर’ची भूमिका महत्त्वाची असून या दृष्टीने परिषदेचे आयोजन केले असल्याचे नमूद करत कुंटे यांनी ऑक्सिजन, औषधे, खाटा आणि चाचण्यांबाबत केलेल्या तयारीची माहिती परिषदेच्या सुरुवातीला दिली.

‘करोना हा लपविण्याचा आजार नाही. जितक्या लवकर निदान तितक्या लवकर कुटुंबासह इतर ठिकाणी या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न लवकर केले जातील. त्यामुळे ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशीच करोनासदृश लक्षणे दिसल्यावर करोना तर नाही ना, अशी प्रथम शंका नागरिक आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांना यायला हवी. दुखणे अंगावर काढल्यास धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी डॉक्टरांनी डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांच्या चाचण्या करण्यासह प्रथम आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच करोनाचे निदान झाल्यावरही अनेकदा गृहविलगीकरणाचे मूलभूत नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे संसर्ग पसरतो. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना लागण होऊ नये म्हणून रुग्णांनी विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. डॉक्टरांनीही यादृष्टीने त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे,’ असे कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले. ‘जाणता मी, जबाबदार मी’ या सूत्राचे पालन प्रत्येकाने करायला हवे, असे डॉ. ओक यांनी व्यक्त केले.

अमेरिकेत वेगाने संक्रमण, कारण..

अमेरिकेत सध्या ज्या भागांमध्ये नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन आणि लसीकरण करण्यास नकार दिला, अशा भागांमध्ये करोनाचे संक्रमण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भारतातील नागरिकांनी पुन्हा तीच चूक करू नये, याकडे डॉ. मेहुल मेहता यांनी लक्ष वेधले.

बरे झाल्यावरही काळजी आवश्यक

करोनामुक्त झाल्यावरही काही जणांना ४ ते १२ आठवडे तर काही जणांना १२ आठवडय़ांनंतरही विविध प्रकारचा त्रास होत असतो. थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, नैराश्य येणे, अस्वस्थ वाटणे आदी प्रकार आढळतात. या रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचे आजारही काही काळाने दिसून येत आहेत. तेव्हा रुग्णांनी याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे मत डॉ. अजित देसाई यांनी व्यक्त केले.

नव्या रूपांना घाबरू नका..

डेल्टा, डेल्टा प्लस, म्यू अशी करोनाची रूपे बदलत असली तरी यापासून संरक्षण करण्यासाठी मुखपट्टी हा एकमेव चांगला उपाय आहे. तेव्हा नागरिकांनी  भीती न बाळगता योग्य रीतीने मुखपट्टीचा वापर करावा आणि लस घ्यावी, असे आवाहन डॉ. शशांक जोशी यांनी केले.

बालके घरीच बरी होतील..

बालकांमध्ये करोनाचा संसर्ग वाढणार असला तरी बहुतांश बालके घरीच बरी होऊ शकतील. त्यामुळे पालकांनी भीती बाळगू नये. अमेरिकेमध्ये अनेक शाळा करोना संसर्ग वाढत असल्यामुळे बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे शाळा उघडताना पूर्वकाळजी घेणे आवश्यक आहे. त्याच वेळी मुलांना घरात कोंडून ठेवल्यामुळे मोबाइलचे व्यसन लागणे, अतिप्रमाणात खाण्यामुळे वजन वाढणे असे काही दुष्परिणाम दिसून येत आहेत, त्याचाही विचार व्हायला हवा, असे डॉ. सुहास प्रभू यांनी सांगितले.

वेळीच निदान महत्त्वाचे

करोनाचा काळ साधारण तीन आठवडे असतो. शरीरातील विषाणूची संख्या जलदगतीने वाढू नये यासाठी देण्यात येणारी औषधे लक्षणे दिसल्यापासून चार ते पाच दिवसांमध्ये देणे गरजेचे आहे. तसेच प्रतिकारशक्ती मुळातच कमी असलेल्या रुग्णांसाठी आता मोनोक्लोनल अ‍ॅण्टिबॉडी उपचार पद्धती प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. ही पद्धतीही सुरुवातीच्या काहीच दिवसांत देणे आवश्यक आहे. म्हणून चाचणी लवकर करून वेळेत निदान करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले. योग्य वेळी योग्य औषधे, प्रतिजैविकांसह औषधांचा योग्य वापर, साखरेचे नियंत्रण, पालथे झोपण्याचे फायदे इत्यादी उपचारातील महत्त्वाच्या बाबींचे पालन कसे आणि का करावे हे त्यांनी परिषदेत मांडले. बराच काळ मुखपट्टी वापरून ओली होती. ओल्या मुखपट्टीतून संरक्षण मिळत नाही तेव्हा नागरिकांनी सोबत दोन ते तीन मुखपट्टय़ा बाळगाव्यात आणि  मुखपट्टय़ा वारंवार बदलाव्यात, असे डॉ. पंडित यांनी सांगितले.