वेळ सकाळची असो वा सायंकाळची.. फलाटावर खच्चून गर्दी.. फलाटावर येणाऱ्या गाडीत त्याहून दुप्पट गर्दी.. या गर्दीत घुसण्यासाठी प्रचंड रेटारेटी.. कर्जत-कसारापासून ते बोरिवली-विरापर्यंत सर्वच फलाटांवरील हे नेहमीचेच दृश्य. अशा गर्दीत गाडीच्या दारात उभे राहायला मिळाले तर चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटते. मात्र, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांना चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरील ही समाधानाची लकेरच पुसून टाकायची घाई झाली आहे! मध्य रेल्वेवर सध्या धावणाऱ्या सर्व लोकल गाडय़ांसह नवीन येणाऱ्या गाडय़ांचे दरवाजे स्वयंचलित असावेत, अशी सूचना करणारे पत्रच त्यांनी रेल्वे बोर्डाला पाठवले आहे.
येत्या शनिवारी असलेल्या जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर महिला सशक्तीकरण विभागातर्फे ‘स्वयंसिद्धा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुनीलकुमार सूद यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी घेण्यात येणारी काळजी, महिला लोकल आणि डब्यांची संख्या वाढवण्याची घोषणा केली. त्याच वेळी अपघात टाळण्यासाठी सर्वच लोकल गाडय़ांचे दरवाजे स्वयंचलित करण्याची सूचनाही त्यांनी केली. एवढेच नव्हे तर सध्या कार्यरत असलेल्या गाडय़ांमध्येही स्वयंचलित दरवाज्यांसाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगत तशी सूचना करणारे पत्रच आपण रेल्वे बोर्डाला पाठवल्याचे ते म्हणाले.
बंबार्डिअर गाडय़ांमध्येही?
उपनगरीय मार्गावर पश्चिम व मध्य रेल्वेवर मिळून एकूण ७२ नव्या बंबार्डिअर गाडय़ा येणार आहेत. या नव्या गाडय़ांचे दरवाजे स्वयंचलित नसल्यास त्यांचा स्वीकार केला जाणार नसल्याचेही सूद यांनी स्पष्ट केले. सूद यांच्या सूचनेबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
उपनगरीय रेल्वेमार्गावरील प्रवासी मजेसाठी नाही, तर नाईलाज म्हणून दरवाज्यात लटकत प्रवास करतात. मध्य रेल्वेने कोणतीही नवी आश्वासने किंवा अशा तुघलकी सूचना देण्याऐवजी गाडय़ा फक्त वेळेवर चालवून दाखवाव्यात. त्यामुळे निम्म्याहून प्रवाशांचा त्रास कमी होईल.
नंदकुमार देशमुख, प्रवक्ते, रेल्वे प्रवासी संघटना.