मुंबई : नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यु सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वेव्हज २०२५’ परिषदेमध्ये शुक्रवारी आठ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. सिडकोने ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’ यांच्याबरोबर प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचा करार केला.
जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार झाले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठामध्ये शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
‘एज्यु सिटी’ प्रकल्पामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांची केंद्रे स्थापन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’च्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’च्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी करारावर स्वाक्षरी केली.
नवी मुंबईत ‘एआय’ तंत्रज्ञान शिक्षणनगरी
जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रात ‘कृत्रिम प्रज्ञे’चा (एआय) वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबईत ‘एआय’ तंत्रज्ञानाची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.