एरवी चिडीचूप असणारा शिवडीचा घासबंदर परिसर २० जुल, २०१६च्या रात्री गोळीबारीच्या फैरींनी दणाणून गेला. पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा शिवडी पोलीस, गुन्हे शाखा, उच्चपदस्थ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. एका तरुणावर गोळ्या झाडल्यानंतर त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केल्याचे स्पष्ट दिसत होते. काहीही करून या तरुणाला संपविण्याच्याच हेतूने हा हल्ला झाल्याचे स्पष्ट होते. निर्जनस्थळी झालेल्या या गुन्ह्य़ाची उकल करणे वरकरणी अवघड वाटत होते. पण, गुन्हे शाखेच्या कक्ष तीनने अवघ्या २४ तासांत मुंबईतून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

शिवडीच्या घासबंदर परिसरातील बोर्ट हार्ट मार्गावर एका व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती २० जुलै २०१६च्या रात्री शिवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तिशीच्या आसपास असलेला एक तरुण त्यांना मृतावस्थेत आढळला. गोळ्यांच्या जखमा आणि तीक्ष्ण हत्यारांनी केलेल्या वारांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळाची पाहणी केल्यावर गोळ्यांच्या दोन रिकाम्या पुंगळ्या आणि बीअरच्या बाटल्याही पोलिसांना सापडल्या. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे नाव सुशांत घोडेकर ऊर्फ बंटी (२७ वष्रे) असल्याचे स्पष्ट झाले. घोडेकर काळाचौकी येथील घोडपदेव येथे राहणारा असून त्याच्यावर भायखळा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचेही कळाले. कॉटन ग्रीन परिसरात उभ्या राहणाऱ्या मालाचे ट्रक यांचे चालक-क्लीनर यांना संरक्षण देण्याच्या नावाखाली बंटी खंडणी वसूल करत असे, अशी माहितीही हाती आली. त्याआधारे गुंडांमधील वैरातून अथवा वादातून हा खून झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त संजय सक्सेना यांनी सर्व गुन्हे कक्षांना या हत्येचा तपास करण्याच्या सूचना केल्या. पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) मोहनकुमार दहिकर आणि साहाय्यक पोलीस आयुक्त अभय शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष तीनच्या अधिकाऱ्यांनीही गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरू केला. घोडेकर घटनास्थळी पोहोचण्याआधी जवळच असलेल्या सुजाता बारमध्ये अतुल नावाच्या एका व्यक्तीसोबत बसला होता, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी घोडेकरच्या संपर्कातील अतुल नावाच्या व्यक्तीची चौकशी सुरू केली, पण त्यातून ठोस माहिती मिळत नव्हती. त्याच वेळी या ठिकाणी असलेल्या स्टीलच्या गोदामाची राखण करणारा हनीफ अल्लाबक्ष शेख (२२) यालाही घोडेकरने अनेकदा धमकावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो बेपत्ता असल्याचे कळल्यावर पोलिसांचा संशय दुणावला. हनीफचा जवळचा मित्र सुशील टेके ऊर्फ अतुलचाही (२५) आदल्या रात्रीपासून ठावठिकाणा नसल्याचे स्पष्ट झाले आणि पूर्ण साखळी उघडकीस येऊ लागली. अतुलचा मित्र अखिलेश मिश्रा (४३) हा खुनाची शिक्षा भोगून बाहेर आलेला आरोपीही यात सहभागी असल्याची माहिती कक्ष तीनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मिळाली. तिघांचाही ठावठिकाणा खबऱ्यांकडून काढणे सुरू असतानाच ते मुंबई सोडून पळून जात असल्याची माहिती गुरुवारी सायंकाळी मिळाली.
पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, हवालदार शरद िशदे, तुषार जगताप, नीलचंद्र पागधरे यांचे पथक तात्काळ रवाना झाले. मुलुंड-ऐरोली जोड रस्त्यावर तिघांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तिघेही शिर्डीला जाऊन केलेल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यास जात होते. तिघांच्या चौकशीत हत्येचे सामाईक कारण उघडकीस आले. घोडेकर हा संपूर्ण परिसरात आपल्या साथीदारांच्या सोबत जाऊन ट्रकचालकांना धमकावून पसे उकळत असे. जवळच असलेल्या स्टीलच्या गोदामाची रखवाली हनीफचे पूर्वज कित्येक पिढय़ांपासून करत होते. घोडेकरने हनीफला गोदामातून स्टील भरून ट्रक निघाला की मला सांग, मी पालिकेच्या जकात नाक्यावर त्याला पकडून पसे उकळेन आणि तुलाही त्यातला वाटा देईन असे सांगत असे. पण पूर्वजांपासून सुरू असलेल्या रखवालीच्या कामाशी गद्दारी करणार नाही, असे हनीफ घोडेकरला उत्तर देई. यामुळे चिडलेल्या घोडेकरने हनीफला अनेकवेळा बेदम मारहाण केली होती. अतुललाही घोडेकरने दम देत हनीफला समजावण्यास सांगितले. एक-दोनदा मारहाणही केली. त्यामुळे हनीफबरोबरच अतुलही घोडेकरवर डूख धरून होता. अतुलने त्याच्यासोबत शिर्डीला पालखीला सोबत येणाऱ्या अखिलेशला हा प्रकार सांगितला. तिघांनीही मिळून घोडेकरला एकदा सज्जड इशारा देण्याचे ठरविले. त्यासाठी अखिलेशने त्याच्या मित्राकडून आणलेली एक बंदूक सोबत घेतली, तर हनीफने मशीद बंदर येथून चाकू आणला. चार ते पाच महिने तिघेही घोडेकरला कसे गाठायचे याचे नियोजन करत होते. पण घोडेकर सतत त्याच्या साथीदारांसोबत असल्याने संधी मिळत नव्हती.
अखेर, एके दिवशी अतुलने धीर करून घोडेकरला शिवडीच्या सुजाता बारमध्ये बोलावले. तिथे घोडेकरने पुन्हा हनीफला कामात मदत करण्यास सांगितले. अतुलने हनीफ तयार असून जाऊन बोलणी करू, असे म्हणत त्याला घासबंदर परिसरात आणले. हनीफ आणि अखिलेश तिथे दारू पिऊन तयारीतच बसले होते. घोडेकर अतुलसह तिथे आल्यावर तिघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि अखिलेशने घोडेकरवर गोळ्या झाडण्यासाठी बंदूक रोखली पण त्यातून गोळीच सुटेना. या प्रयत्नात दोन गोळ्या हवेत झाडल्या गेल्या. जिवाच्या आकांताने पळू लागलेल्या घोडेकरला अखिलेशची एक गोळी लागली, तर हनीफने वाट करून देत घोडेकरवर चाकूने वार केले. घोडेकरचा मृत्यू झाल्याचे पाहून तिघेही पसार झाले. पण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तिघांनाही २४ तासांच्या आत बेडय़ा ठोकल्या.