‘पुत्रप्राप्ती’चा प्रसार केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस; उत्तर न आल्यास सोमवारनंतर कारवाई
‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातून पुत्रप्राप्तीसाठी उपाय सुचवून त्याचा प्रचार व प्रसार करुन गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याचा ठपका ठेवत प्रसिद्ध आयुर्वैद्य डॉ. बालाजी तांबे यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. शनिवापर्यंत खुलाशाची वाट बघून सोमवारी किंवा त्यानंतर कोणत्याही क्षणी लेखक डॉ. तांबे यांच्यासह प्रकाशक व विक्रेते यांच्याविरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यातील तरतुदीनुसार तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर, केंद्र सरकारने २००३ मध्ये पुरुषप्रधान प्रवृत्तीला पायबंद घालणारा, लिंगनिवडीला प्रतिबंध करणारा आणि पर्यायाने मुलींचा जन्म सुरक्षित करण्यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ कायदा केला. या कायद्याचे वैशिष्टय़ म्हणजे, गर्भलिंग निदान करणाऱ्या किंवा प्रसवपूर्व लिंग निवड करण्याचा प्रचार-प्रसार करणाऱ्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात न जाता थेट न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.
या कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन तरुण सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी डॉ. बालाजी तांबे लिखित ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातील पुत्रप्राप्तीबद्दल सुचविलेले उपाय व त्यामुळे कायद्याचा झालेला भंग, या संदर्भात अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय शल्यचिकित्सकांना नोटीस देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ४ डिसेंबर २०१५ रोजी घेतलेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत तांबे व इतरांनी कायद्याचा भंग केला असल्याने त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करावी, असा ठराव करण्यात आला. या ठरावानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी तक्रारदाराच्या नोटिशीतील आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजीव घोडके यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अद्याप उत्तरच नाही..
डॉ. घोडके यांनी १९ डिसेंबर २०१५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून नोटीस मिळताच पाच दिवसांत खुलासा करण्यास कळविले. मात्र कुणाकडूनही खुलासा आला नसल्याचे डॉ. घोडके यांनी सांगितले. शनिवापर्यंत खुलासा आला नाही तर, सोमवारी किंवा त्यानंतर कोणत्याही क्षणी न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. तांबे यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते परदेशात गेल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकणार नाही, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal case likely to filed on dr balaji tambe
First published on: 06-01-2016 at 04:56 IST