बँका, एटीएम केंद्रांवर चलनतुटवडा; नोकरदारांचा पहिल्याच तारखेला हिरमोड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकरदारांच्या सोयीसाठी केवळ कार्यालयीन वर्दळीच्या भागातील बँकांच्या शाखा व एटीएम केंद्रांतच रोकड उपलब्ध करून देण्यात आल्याने दक्षिण मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल, कमला मिल कंपाऊंड अशा मर्यादित केंद्रांतच गुरुवारी रोख रकमेचे चलनवलन होऊ शकले. इतर ठिकाणच्या एटीएम केंद्रांमध्येच नव्हे तर बँकांमध्येही चलनाचा खडखडाट होता. त्यामुळे, पगाराच्या पहिल्या दिवशी ठरावीक भाग वगळता इतर ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेलेल्या नोकरदारांच्या हालांना पारावार उरला नाही.

देशभरात तब्बल दोन लाख एटीएममध्ये पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा सामावण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आले आहेत. मात्र तरीही पैसे काढताना नोकरदारांना गुरुवारी वणवण करावी लागली. ज्या ठरावीक ठिकाणी एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून देण्यात आले होते. तिथेही बहुतांश दोन हजारांच्या नव्याच नोटा आहेत. या नोटा घरखर्च किंवा इतर लहानमोठय़ा खर्चाकरिता वापरणे सोयीचे नसल्याने येथून रोख काढणारेही नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यातून लांबच लांब रांगा एटीएमबाहेर असल्याने तिथेही तासन्तास उभे राहण्याशिवाय गत्यंतर नाही. परिणामी हातातले काम सोडून पैसे काढण्याकरिता धावावे लागत आहे. ‘आमच्या घराजवळच्या एटीएममध्ये पैसे नाहीत. असले तरी ते लवकर संपतात. त्यामुळे आम्हाला कार्यालयाजवळच्या एटीएममधून पैसे काढण्याशिवाय गत्यंतर नाही,’ अशी प्रतिक्रिया पूनम मौर्या या फोर्ट परिसरात एटीएमबाहेर रांगेत उभ्या असलेल्या एका नोकरदार तरुणीने व्यक्त केली. हातातले काम सोडून तासन्तास रांगेत उभे राहिल्याशिवाय पैसे मिळत नाहीत, अशा तक्रारीची पुस्ती तिच्यासोबत असलेल्या अक्षता गोवेकर हिनेही जोडली. तर ‘एटीएममधून एका वेळी केवळ २५०० रुपयेच काढता येतात. एटीएममध्ये ५०० रुपयांची नोट नाही. त्यामुळे, केवळ दोन हजारांवर समाधान मानावे लागते,’ अशा शब्दांत येथील इंडियन बँकेच्या एटीएमबाहेर उभ्या असलेल्या बिना तेली या  महिलेने नाराजी व्यक्त केली.

भिंतीवरच्या दिनदर्शिकेचे पान उलटल्यावर झळकणारी महिन्याची पहिली तारीख म्हणजे समस्त नोकरदारांसाठी आनंदाचा दिवस. घराचं, कुटुंबाचं अर्थकारण ज्या पगारावर अवलंबून असतं, त्या वेतनदिनाची अनेक नोकरदार चातकासारखी वाट पहात असतात. मात्र, कालची एक तारीख या सगळ्याला अपवाद ठरली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे चलनचटके सहन कराव्या लागणाऱ्या नोकरदारांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी बँका आणि एटीएम केंद्रांच्या दारात रांगा लावून उभे राहावे लागले. हे चित्र संपूर्ण देशभरात होते. गेल्या तीन आठवडय़ांपासून सहन करत असलेल्या या चलनचटक्यांमुळे पहिली तारीख असूनही जमाना खूश नव्हताच..

पेट्रोल पंपावर पाचशेच्या जुन्या नोटा बंद

पेट्रोल पंप आणि विमान तिकिटांवर आज (शुक्रवार) मध्यरात्रीपासून पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा चालणार नसल्याचे केंद्राने जाहीर केले. मात्र, स्वयंपाकाच्या गॅससह अन्य सवलती चालू राहणार असल्याचेही स्पष्ट केले. यापूर्वी पेट्रोल पंप व विमानांसाठी पाचशेच्या जुन्या नोटांची सवलत १५ डिसेंबरपर्यंत होती.

  • अनेक निवासी भागातील एटीएम नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंदच आहेत. तर पगारदारांच्या सोयीसाठी बँकांनी कार्यालयीन इमारतीत मर्यादीत काळासाठी मायक्रो एटीएमची सोय केली आहे.
  • बँकांच्या शाखांमध्ये रोकडीच्या चणचणीमुले सकाळी हजेरी लावणाऱ्या मर्यादीत ग्राहकांना टोकन देऊन खात्यातून पैसे काढण्याची सुविधा मुभा बँकांकडून दिली जात आहे.
  • अनेकांनी गरज नसतानाही केवळ खबरदारी म्हणून अतिरिक्त रोख रक्कम जवळ बाळगली आहे. त्यामुळेही बाजारातील चलनतुटवडा अधिक तीव्र झाल्याचे बँकांचे म्हणणे आहे.
  • बँकांच्या एटीएम आणि शाखांवरील ताण कमी करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांच्या ‘पॉस’च्या (पॉईंट ऑफ सेल) मार्फत डेबिट कार्डाद्वारे रोख काढण्याची मुभा खातेदारांना दिली आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी एका दिवसात केवळ ५० खातेदारच आपली रोख रकमेची गरज भागवू शकणार आह . त्यामुळे हा उपायही फारसा प्रभावी ठरण्याची शक्यता नाही.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Currency shortage in india
First published on: 02-12-2016 at 00:42 IST