हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने मुंबईकर हैराण
शहरातील कमाल तापमान सध्या ३५ अंश सेल्सिअसपर्यंतच जात असले तरी हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने उष्मा निर्देशांकानुसार जाणवणारे तापमान हे तब्बल ४५ ते ५० अंश सेल्सिअसच्या घरात जात आहे! त्यातही गेला आठवडाभर उपनगरांपेक्षा दक्षिण मुंबईतील तापमान व बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्याने फोर्ट परिसरात कामानिमित्त येणाऱ्यांना घामाने चिंब होण्याचा अनुभव येत आहे.
यंदाचा मे महिना तापमानाच्या दृष्टीने सुसह्य़ आहे, मात्र केवळ तापमापकातील पाऱ्याची उंची पाहून मुंबईतील तापमानाचा अंदाज लावता येत नाही. अनेकदा ४० अंश सेल्सिअसपलीकडे जात असलेल्या शहराची हवाही मुंबईच्या तुलनेत सुसह्य़ असल्याचे जाणवते. मे महिन्यात पश्चिम दिशेने, समुद्रावरून भरपूर बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांमुळे हे घडते. सध्या मुंबईत सांताक्रूझ व कुलाबा या ठिकाणी दुपारचे तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्याच वेळी हवेतील सापेक्ष आद्र्रता ६० ते ७० टक्क्यांवर पोहोचते. तापमान व बाष्पाचे प्रमाण यातून उष्मा निर्देशांक (हीट इंडेक्स) काढण्याचे गणिती सूत्र आहे. या सूत्राचा वापर केल्यास मुंबईतील सध्याचे तापमान हे प्रत्यक्षात ४५ ते ५० अंश से. तापमानाएवढे जाणवत असल्याचे समोर येते. शनिवारी सांताक्रूझ येथे ३३.८ अंश से. कमाल तापमान व ६१ टक्के सापेक्ष आद्र्रता होती. उष्मा निर्देशांकानुसार सांताक्रूझ येथील जाणवणारे तापमान तब्बल ४६ अंश से. होते. याच वेळी कुलाबा येथील कमाल तापमान ३४ अंश से. व सापेक्ष आद्र्रता ७३ टक्के होती. उष्मा निर्देशांकानुसार कुलाबा येथील जाणवणारे तापमान ५० अंश से. एवढे होते.
हवेतील बाष्पाचे प्रमाण जेवढे अधिक तेवढे घाम येण्याचे प्रमाणही वाढते. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून उष्मा निर्देशांक देण्यात येत नव्हता.
मात्र उष्णतेच्या लाटांची वाढलेली संख्या तसेच तापमानाबाबत येत असलेली जागरूकता या पाश्र्वभूमीवर गेल्यावर्षी उष्मा निर्देशांकही प्रायोगिक स्तरावर देण्याची सुरुवात झाली, असे हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय हवामानशास्त्र विभाग व पुण्याच्या आयआयटीएम संस्थेने यावर्षी सादर केलेल्या अभ्यासात मुंबईचा उष्मा निर्देशांक पावसात उष्ण श्रेणीमध्ये, तर उन्हाळ्यात अतिउष्ण श्रेणीमध्ये पोहोचत असल्याचे समोर आले.
मोसमी वारे तीन दिवसांनी पुढे सरकणार..
अंदमानमध्ये मोसमी वारे १४ मे रोजी पोहोचले असले तरी ते तिथून फारसे पुढे सरकलेले नाही. तीन दिवसांनंतर हे वारे पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल, असा केंद्रीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार हे वारे ३० मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर येतील. दरवर्षी साधारण २० मे रोजी अंदमान व १ जून रोजी मोसमी वारे केरळमध्ये पोहोचतात. केरळमध्ये मोसमी वारे पोहोचल्यावर जमिनीवरील त्यांच्या पुढील प्रवासाबाबत नेमका अंदाज करता येतो.