जाहिरात मिळवून देतो असे सांगून मॉडेल्सची फसवणूक करणारा नृत्य दिग्दर्शक जीत सोनावणे मॉडेल्सना सायबर कॅफेतून ईमेल्स पाठवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी नागपाडा आणि महंम्मद अली रोड येथील चार सायबर कॅफेत छापे घातले.
 जीत हा डान्स इंडिया डान्स या शो मध्ये सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करीत होता. विविध जाहिरातींमध्ये काम आहे असे सांगून तो मॉडेल्सना पंचतारांकीत हॉटेल्स मध्ये बोलावत होता. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करत होता. याप्रकरणी  गुन्हे शाखा ८ च्या पथकाने शुक्र वारी त्याला अटक केली होती. त्याने आतापर्यत सहा मॉडेल्सची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या संगणकातील हार्ड डिस्क आम्ही ताब्यात घेतली असून त्यातून त्याचे अनेक कारनामे पुढे येण्याची शक्यता गुन्हे शाखा ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फटांगरे यांनी सांगितले.