मुंबई : सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे दोन नवे अभ्यासक्रम आयआयटी मुंबईने सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ४ जानेवारी २०२६ पासून अध्यापन सुरू होणार आहे. या व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची रचना उद्योग–शैक्षणिक समन्वित स्वरूपावर आधारित असून आयआयटी मुंबईच्या ट्रस्ट लॅब, संगणक अभियांत्रिकी विभागामार्फत हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.

सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे दोन्ही अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन असून प्रत्येक अभ्यासक्रमाचा कालावधी १२ महिने आहे. तीन संरचित अभ्यासक्रम आणि साप्ताहिक लॅब सत्राचा यात समावेश आहे. प्रत्यक्ष व्यावसायिक वातावरणाशी मिळत्याजुळत्या पद्धतीने होणाऱ्या या सत्रांमुळे विद्यार्थ्यांना संकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष कामाची कौशल्ये दोन्ही विकसित करता येतील, असे आयआयटी मुंबईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सायबर सिक्युरिटी कार्यक्रमांतर्गत नव्याने समाविष्ट केलेल्या नेटवर्क सिक्युरिटी या १४ आठवड्यांच्या अभ्यासक्रमात संगणक जाळ्यांचे संरक्षण, सायबर धमक्यांना उत्तर देण्याच्या रणनीती, सुरक्षित प्रोटोकॉल्स आणि नेटवर्क हार्डनिंग तंत्रांचा सखोल अभ्यास अपेक्षित आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत सुरू होणाऱ्या फुल-स्टॅक एमईआरएन डेव्हलपमेंट विथ ॲपचे आणि एनजीएनएक्स या १४ आठवड्यांच्या अभ्यासक्रमाद्वारे आधुनिक फ्रेमवर्क्स आणि सर्व्हर कॉन्फिगरेशनचा वापर करून सुरक्षित, स्केलेबल वेब अनुप्रयोग विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याशिवाय उर्वरित आठवड्यांमध्ये या आधी आखलेले विषय शिकवले जातील.

३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ असून प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी https://trustedge.iitb.ac.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.