निसर्ग चक्रीवादळ तीन जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादाळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या काही तुकडयाही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकडयांपैकी १० तुकडया तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या सहा तुकडया राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणूऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कच्चा घरात राहत असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.

‘मुंबईकरांनीही खबरदारी बाळगावी’
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनीही आवश्यक खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. महानगरपालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील संभाव्य धोके पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करुन तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone nisarga mumbai maharashtra alert dmp
First published on: 02-06-2020 at 07:36 IST