वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक हे आज (दि.३० एप्रिल) सेवानिवृत्त होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्य सचिव पदासाठी डी. के. जैन आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या नावाची चर्चा होती. सेवाज्येष्ठतेचा निकष हा गाडगीळ यांच्या बाजूने होता. जैन हे १९८३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते ३१ जानेवारी २०१९ ला सेवानिवृत्त होतील. कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून जैन यांची ओळख आहे.

सौम्य प्रवृत्तीचे अधिकारी अशी मलिक यांची ख्याती आहे. राज्यातील निवडणुकांना अवघी दोन वर्षे उरली आहेत. त्यामुळे सरकारच्या घोषणांची-निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून घेऊ शकेल, अशी व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्य सचिवपदी हवी होती. त्यामुळे मुख्य सचिव बदलाचे बऱ्याच काळापासून घाटत होते. मात्र, मलिक हे दलित असल्याने त्यांना तडकाफडकी पदावरून दूर करणेही सरकारला राजकीयदृष्टय़ा गैरसोयीचे असल्याने ते लांबणीवर पडत होते. दरम्यानच्या काळात राज्याचे मुख्य माहिती आयुक्तपद काही महिन्यांपासून रिक्त असल्याने उच्च न्यायालयाने सरकारचे कान टोचले. ही संधी साधत राज्य सरकारने मलिक यांना मुख्य माहिती आयुक्त या मानाच्या व पुढील पाच वर्षांसाठीच्या पदावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला. अखेर मलिक यांनी तो स्वीकारल्याचे समजते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D k jain appointed as a chief secretary of maharashtra state
First published on: 30-04-2018 at 13:07 IST