अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाचा निर्णय
अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने (१३ जून) सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता कबुतरखाना-दादर ते रवींद्र नाटय़ मंदिर-प्रभादेवी दरम्यान ‘बेस्ट’ची वातानुकूलित बससेवा विनाशुल्क उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मंदिर प्रशसनाने हा निर्णय घेतला आहे.
‘बेस्ट’ प्रशासनाने तोटय़ाच्या कारणास्तव बंद केलेल्या वातानुकूलित बसगाडय़ांचा वापर या सेवेसाठी केला जाणार आहे. येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी विचारात घेऊन दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगाचेही नियोजन करण्यात आले आहे. सोमवार १२ जून रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवार १३ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यत या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
तीन मध्यम तर तीन मोठय़ा अशा एकूण सहा बेस्टच्या वातानुकूलित बसचा वापर या सेवेसाठी करणार असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. सोमवारी मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.१५ त्यानंतर पहाटे ३.५० ते रात्री ९ आणि रात्री १०.३० ते रात्री १२ वाजेपर्यत मंदिर भाविकांसाठी सुरु राहणार आहे. दर्शनासाठी पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या रांगेचीही व्यवस्था प्रशासनाने केली असल्याचे पाटील म्हणाले.