मुंबई : ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी. एन. नगर) मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते आरे आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील दहिसर ते आरे टप्प्याचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र शनिवारी संध्याकाळी उद्घाटन होणार असल्याने त्याच दिवशी सेवा सुरू करणे शक्य नसल्याने रविवारपासून प्रवासी वाहतूक सुरू केली जाणार आहे.
पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास वेगवान करण्यासाठी ‘मेट्रो २’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. ‘मेट्रो २’ मार्गिकेअंतर्गत दहिसर ते डी. एन. नगर अशी ‘मेट्रो २ अ’ मार्गिका बांधली जात आहे. त्याच वेळी दहिसर ते अंधेरी अशी ‘मेट्रो ७’ मार्गिकेचेही बांधकाम सुरू आहे. या दोन्ही मार्गिका याआधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि इतर तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. आता मात्र शनिवारी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मधील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल आणि रविवारपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.
प्रवासी वाहतुकीला सुरुवात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र शनिवारी संध्याकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर तात्काळ सेवा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून दहिसर ते आरे मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल, असेही श्रीनिवास यांनी सांगितले. सध्या पहिल्या टप्प्यासाठी ११ गाडय़ा असून वर्षभरात आणखी २० गाडय़ांची भर पडेल. महत्त्वाचे म्हणजे या मार्गिकेमुळे पश्चिम द्रुतगती मार्ग आणि उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना तिकिटात सवलत
पहिल्या टप्प्यासाठी १०, २०, ३०, ४० आणि ५० रुपये असे तिकीट दर असणार आहेत. सध्या पासची सुविधा उपलब्ध नसली तरी लवकरात लवकर पासची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे श्रीनिवास यांनी या वेळी सांगितले. तसेच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत नेमकी कशी असेल आणि ती कधी लागू होईल हे लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2022 रोजी प्रकाशित
दहिसर-आरे मेट्रो प्रवास रविवारपासून; गुढीपाडव्याला उद्घाटन मात्र प्रत्यक्ष सुरुवात दुसऱ्या दिवशी
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी. एन. नगर) मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते आरे आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील दहिसर ते आरे टप्प्याचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 01-04-2022 at 03:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahisar aarey metro journey from sunday inauguration gudipadva however started second day chief minister uddhav thackeray amy