आसपासच्या कारखान्यांतून सोडण्यात येणारे रसायनयुक्त पाणी आणि सोसायटय़ा-झोपडपट्टय़ांतील सांडपाण्यामुळे एके काळी हिंदी सिनेमांतून झळकलेली निर्मलसुंदर दहिसर नदी आज विषारी गटारगंगा बनली आहे. एवढेच नव्हे तर या नदीचे पाणी ‘प्राणहीन’ झाले आहे. नदीच्या पाण्यात प्राणवायूच शिल्लक नसून त्यात मोठय़ा प्रमाणावर नायट्राइट आणि क्लोराइड हे विषारी घटक आढळून आले आहेत.
मुंबईमध्ये २६ जुलै २००५ मध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर मुंबईतील नद्यांकडे प्रशासनाचे लक्ष गेले. मुंबईत हाहाकार उडवून देणाऱ्या मिठी नदीवर सरकार आणि प्रशासनाने लक्ष केंद्रित केले होते. मात्र दहिसरसह अन्य नद्यांकडे आजही दुर्लक्ष झाले आहे. माजी महापौर शुभा राऊळ यांनी दहिसर नदीतील पाण्याचे वेगवेगळ्या १० ठिकाणांहून नमुने घेऊन त्यांची पालिकेच्या प्रयोगशाळेत तपासणी करून घेतली. नदीच्या पाण्यात प्राणवायूच नसल्याची धक्कादायक बाब प्रयोगशाळेच्या अहवालात उघडकीस आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या दहिसर नदीमधील बोटिंग क्लबच्या परिसरातून पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर विषारी घटक आढळून आले असून त्यामुळे हे पाणी जलविहार करणाऱ्या पर्यटकांसाठीही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
आजही आसपासच्या कारखान्यांमधून रसायनयुक्त पाणी व सोसायटय़ा-झोपडपट्टय़ांमधून सांडपाणी सोडले जात आहे. त्यात भर म्हणून आसपासच्या गोठय़ांमधील शेणमिश्रित पाणीही नदीतच सोडले जात आहे. या नदीला पूर्वीचे निर्मळ रूप पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने शुद्धीकरणाचे काम हाती घेण्याची मागणी आपण पालिका आयुक्त अजय मेहतांकडे करणार आहोत, असे शुभा राऊळ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahisar chemical water in river
First published on: 28-06-2015 at 04:18 IST