बँकॉकमध्ये होणाऱया शासकीय नृत्यस्पर्धेसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून जाहीर करण्यात आलेला आठ लाखांचा निधी कलावंतांनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री मदत निधीतून शासकीय नृत्यस्पर्धेसाठी निधी देण्याच्या निर्णयावर टीकेला सुरूवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात बँकॉक येथे होणाऱया नृत्यस्पर्धेसाठी मुख्यमंत्र्यांनी आठ लाखांचा निधी मंजूर केल्याचे माहिती आणि अधिकार कार्यकर्ते अनिल गगलानी यांनी दाखल केलेल्या याचिकेत स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीनंतर हा निधी सचिवालय जिमखाना या खासगी संघटनेच्या खात्यात जमादेखील करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर तोंडसुख घेण्यास सुरूवात केली. राज्य सरकारला दुष्काळापेक्षा नृत्य स्पर्धेला निधी देणे महत्त्वाचे वाटत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. अखेर सचिवालय जिमखाना या संघटनेअंतर्गत या स्पर्धेत सहभागी होणाऱया कलाकारांनी आज मुख्यमंत्र्यांचा निधी परत करत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, सरकारच्या निर्णयात काही अयोग्य नसून १९६७ साली अस्तित्वात आलेल्या मुख्यमंत्री मदत निधीतून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निधी देण्याचीही तरतूद असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.