डोंबिवली पश्चिमेतील कर्वे रस्त्यावरील ‘हारकू निवास’ ही धोकादायक इमारत गुरुवारी रात्री एका बाजूला खचली. या घटनेनंतर इमारतीमधील २९ रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.
‘हारकू निवास’ ही तीस वर्षांपूर्वीची इमारत आहे. दोन माळ्याची ही इमारत धोकादायक झाल्याची नोटीस पालिकेने सहा महिन्यांपूर्वी इमारतीच्या मालकाला दिली होती. रात्री साडेनऊ वाजता इमारत एका बाजूने खचत असल्याचे काही रहिवाशांच्या लक्षात येताच खळबळ उडाली. इमारतीमधील एका गॅलरीचा सज्जा खाली कोसळला. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी, पालिका अधिकारी, अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले. तातडीने रहिवाशांना घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले. या रहिवाशांची पालिकेच्या पु. भा. भावे सभागृहात तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका हद्दीत सुमारे ५५० धोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असताना, पालिका प्रशासनाने शनिवारच्या महासभेत भूमाफियांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांना चोरून घेण्यात आलेल्या नळजोडण्या अधिकृत करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

खालच्या भाषेतील टीका किती काळ सहन करणार? एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…