अन्यथा ठाण्यातील धोकादायक इमारतींवर हातोडा

ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील सुमारे एक हजार धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) तेथील रहिवाशांनी स्वखर्चाने करून घ्यावे आणि त्याचा अहवाल महापालिकेस सादर करावा.

ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील सुमारे एक हजार धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) तेथील रहिवाशांनी स्वखर्चाने करून घ्यावे आणि त्याचा अहवाल महापालिकेस सादर करावा. अन्यथा या इमारती पाडून टाकण्याची कार्यवाही महिनाभरात सुरू केली जाईल, असा इशारा ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी गुरुवारी मुंब्रा परिसरातील नगरसेवकांच्या एका बैठकीदरम्यान दिला. अतिधोकादायक इमारतींच्या यादीत समावेश नसलेल्या धोकादायक इमारतीही कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे अहवाल सादर झाला नाही तर त्या पाडून टाकण्याशिवाय पर्याय नाही, असेही गुप्ता या वेळी म्हणाले.
मुंब्रा परिसरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणाऱ्या महापालिकेच्या पथकाला या भागातील रहिवाशांकडून असहकार होत आहे. त्यामुळे मालमत्ता सर्वेक्षणाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला मुंब्र्यातून खोडा बसला असून या मोहिमेस सहकार्य मिळावे, यासाठी आयुक्त गुप्ता यांनी गुरुवारी सायंकाळी मुंब्रा, कळवा आणि दिवा परिसरातील नगरसेवकांची एक बैठक आयोजित केली होती. मुंब््रयासह ठाणे, कळवा परिसरातील सुमारे एक हजार इमारती धोकादायक म्हणून यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी तातडीने संरचनात्मक परीक्षण करून त्यासंबंधीचा अहवाल महापालिकेस सादर करावा, यासंबंधीच्या नोटिसा आठवडाभरात रहिवाशांना पाठविण्यात येणार आहे, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका हद्दीत ६१ इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारती पाडाव्याच लागणार आहेत. याव्यतिरिक्त ज्या इमारती धोकादायक आहेत त्यांचे संरचनात्मक परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. मुंब््रयातील अतिधोकादायक इमारतींमधीलरहिवाशांना वर्तकनगर भागातील रेन्टल हाऊसिंगच्या घरांमध्ये स्थलांतरित व्हावेच लागेल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

आम्ही मूर्ख नाही..
मुंब्रा, कळवा परिसरातील ज्या इमारती अतिधोकादायक आहेत त्या पाडण्याची कारवाई टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. या इमारती पाडल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या जमिनींवर पुन्हा बेकायदा इमले उभे राहण्याची भीती या भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक रौफ लाला यांनी या बैठकीत व्यक्त केली. त्यावर आयुक्त गुप्ता यांनी यापुढे हे शक्य नाही, असे उत्तर दिले. ‘एवढे सगळे झाल्यावर मोकळ्या झालेल्या जमिनींवर पुन्हा बेकायदा बांधकाम उभे राहील आणि त्याला आशीर्वाद देण्याची िहमत पोलीस किंवा आमचे (महापालिकेचे) अधिकारी दाखवतील, असे मला वाटत नाही. आता कुणी गडबड करेल एवढे मूर्ख पोलीस आणि आम्ही नाही,’ असा टोला गुप्ता यांनी शासकीय अधिकाऱ्यांना लगावला.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dangerous buildings in thane may demolish if not get done structural audit