मुंबई : मुंबईतील चारही प्रादेशिक परिवहन कार्यालयांत (आरटीओ) महत्त्वाची पदे रिक्त असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा खोळंबा होऊ लागला आहे. काही वर्षे ही पदे भरण्यातच आलेली नाहीत. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. वडाळा आणि अंधेरीला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. इतकेच नव्हे तर  सर्वच आरटीओत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (डेप्युटी आरटीओ), सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह (एआरटीओ) मोटर वाहन निरीक्षक आदी पदे रिक्त आहेत.

शिकाऊ, कायमस्वरुपी अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि परवाना (परमिट), त्यांचे नूतनीकरण, याशिवाय वाहनांशी संबंधित कामे घेऊन अनेक नागरिक आरटीओत येत असतात. यासाठी नागरिकांना अर्धा दिवस खर्च करावा लागतो. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात आरटीओतील कामे बंदच होती. टाळेबंदी शिथिल होताच कामांना वेग देण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र अपुरे मनुष्यबळ आणि कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडणारे अतिरिक्त काम यामुळे मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओत वाहनचालकांची काही कामे खोळंबत आहेत.निर्णय घेऊन वाहनांशी, तसेच कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक कामे तडीस नेणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी हे पदच वडाळा आणि अंधेरी आरटीओत रिक्त आहे. अंधेरीतील प्रादेशिक परिवहन अधिकारी पद गेल्या एक वर्षांपासून, तर वडाळातील पद गेल्या सहा महिन्यांपासून परिवहन विभागाने भरलेलेच नाही. परिणामी, येथील उप प्रादेशिक तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावरच कामाचा ताण येत असून अनेक महत्त्वाच्या निर्णयांसाठी परिवहन आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो.

अंधेरी आरटीओत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची चार पदे मंजूर असून यातील एकच पद भरलेले आहे. तर मोटर वाहन निरीक्षकाच्या २१ मंजूर पदांपैकी तब्बल १२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अंधेरी आरटीओत कामांचा काहीसा गोंधळच आहे. वडाळा आरटीओतही प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाव्यतिरिक्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त असून दहापेक्षा जास्त वाहन निरीक्षकांची पदे भरलेली नाहीत. दक्षिण मुंबईतील सर्वात व्यस्त आणि नेहमीच नागरिकांच्या गर्दीने गजबजणारे ताडदेव आरटीओमध्येही अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करावा लागत आहे. तेथे आठपेक्षा जास्त मोटर वाहन निरिक्षकांची पदे रिक्त आहेत, तर दोनपैकी एक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उपलब्ध असून चारपैकी दोनच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. उपनगरातील बोरिवली आरटीओतही मोटर वाहन निरीक्षकाची बारापैकी पाच पदे रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अपुरे मनुष्यबळ

 मुंबईतील चारही आरटीओत अधिकाऱ्यांची पदे रिक्त असतानाच कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. वडाळा आरटीओत जवळपास ४५ टक्के कर्मचारी कमी आहेत. तर अंधेरी आणि ताडदेवलाही हीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले. शिकाऊ लायसन्ससाठी अपॉईंटमेंट ऑनलाईन जरी असल्या तरीही कर्मचारीच नसल्याने ती अपॉईंटमेंटही चालकांना वेळेत उपलब्ध होत नाही. नवीन पक्क्या लायसन्ससाठी प्रयत्न करणाऱ्या तारखा खूपच पुढच्या मिळतात. वहन योग्यता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्यांनाही ताटकळतच राहावे लागते.

अनेक जिल्ह्य़ांतही हीच स्थिती

राज्यात १५ ठिकाणी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ अधिकारी) यांच्यासह उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीही कार्यरत आहेत. यामध्ये मुंबईमधील आरटीओ कार्यालयांचा समावेश आहेत. काही जिल्ह्यांत प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जबाबदारी ही फक्त उप प्रादेशिक अधिकारी आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवरच आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हा त्या-त्या जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयाचा प्रमुख असतो. तर या पदाखाली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी येतात. वाहन नोंदणी, लायसन्स (अनुज्ञप्ती), परवाना, वाहन कर यासह अनेक कामे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अखत्यारित होत असतात.