मध्य रेल्वे प्रशासनाला दर दिवशी तब्बल एक कोटींची बचत करून देणाऱ्या डीसी-एसी परिवर्तनाचा पहिला टप्पा ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत पूर्ण झाल्यानंतर आता प्रशासनाने मोठे लक्ष्य समोर ठेवले आहे. येत्या सहा महिन्यांत ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या शेवटच्या टप्प्यातील डीसी-एसी परिवर्तन पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. हे परिवर्तन झाल्याशिवाय मध्य रेल्वेवर नवीन बंबार्डिअर गाडय़ा धावणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता या परिवर्तनावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य रेल्वेवर शनिवारची रात्र ऐतिहासिक रात्र ठरली. या रात्री कल्याण ते ठाणे या दरम्यानची वाहतूक डायरेक्ट विद्युतप्रवाहावरून अल्टरनेट विद्युतप्रवाहावर सुरू झाली. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठाण्यापर्यंत पाचव्या व सहाव्या मार्गावरील वाहतूकही एसी विद्युतप्रवाहावर सुरू झाल्याने आता लोकमान्य टिळक टर्मिनसपासून लांब पल्ल्याच्या गाडय़ा एकाच विद्युतप्रवाहावर चालणार आहेत. या परिवर्तनामुळे दर दिवशी रेल्वेची एक कोटी रुपयांची बचत होणार असल्याचेही रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
कल्याण-ठाणे या टप्प्यात झालेले हे परिवर्तन आता लवकरच ठाण्याच्या पुढेही करण्यात येणार आहे. दर रविवारच्या मेगा ब्लॉकदरम्यान ठाणे ते सीएसटीदरम्यान हे तांत्रिक काम हाती घेण्यात येईल. हे काम टप्प्याटप्प्यात होणार असून येत्या सहा महिन्यांत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. यासाठी गरज पडल्यास काही विशेष ब्लॉक्सही घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली़