पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत चक्क मृत कावळा आढळल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पाण्यातून दरुगधी आणि पक्ष्याची पिसे येत असल्याची तक्रार प्रभूआळी येथील रहिवाशांनी केल्यानंतर पालिकेला जाग आली. जलवाहिनीची साफसफाई करताना त्यातून चक्क मृत कावळा सापडला. पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत किती उदासीन आहे, हेच यातून दिसून येते. मुख्याधिकारी सुधाकर जगताप यांच्या वेळ मारून नेण्याच्या कारभारामुळे नागरिकांना कित्येक महिने अशुद्ध पाणी प्यावे लागल्याचा आरोप नगरसेवक रमेश गुडेकर यांनी केला आहे. पालिकेच्या जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण असून त्या तातडीने बदलून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.