मुंबईः उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबतची चित्रफीत समाज माध्यमावर शेअर केल्याप्रकरणी योगेश सावंत नावाच्या व्यक्तीला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिवसेना पदाधिकारी अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी भादंवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (३), ५०६ (२) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, मंगळवारी सायंकाळी तक्रारदार फेसबुक पाहत असताना एका चित्रफीतीमध्ये मुलाखत देणारी व्यक्ती उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ठार मारण्याबाबत वक्तव्य करीत होता. तसेच यावेळी त्याने दोन जातींमध्ये वाद निर्माण होईल, असे वक्तव्यही केले. तसेच फडणवीस यांची बदनामी केली. ही चित्रफीत युट्युब, फेसबुक व ट्वीटरवर वायरल झाली होती. ‘योगेश सावंत ७७९६’ या वापरकर्त्याने ती फेसबुकवर अपलोड केली होती. तसेच ट्वीटरवरही एका युजरआडीवरून ही चित्रफीत अपलोड करण्यात आली होती. त्यामुळे फडणवीस यांना ठार मारण्याची धमकी व दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी चित्रफीत शेअर करणाऱ्या योगेश सावंतला पनवेल येथून अटक केली. याप्रकरणी आणखी आरोपींच्या शोधात पोलीस संभाजी नगर येथे गेले आहेत. सावंत हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहेत. त्याने फक्त चित्रफीत त्याच्या प्रोफाईलवरून शेअर केली होती. याप्रकरणी इतर आरोपींचा शोध सुरू आहेत. त्यांची या प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिक असल्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death threat to deputy chief minister fadnavis on social media the person who shared the video was arrested mumbai print news amy
First published on: 29-02-2024 at 22:17 IST