मुंब्रा येथील मोतसीम मुस्लीम कासमी या व्यावसायिकाच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवत १५ लाखांच्या खंडणीसाठी धमकाविणाऱ्या पाच खंडणीखोरांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश असून ती संबंधित व्यावसायिकाची दूरची नातेवाईक आहे. तिनेच या व्यावसायिकाची संपुर्ण माहिती आपल्या चार साथीदारांना पुरवली होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली.
मनिष रामविलास नागोरी (२४), संतोष उर्फ सनी अनंता बगाडे (२२), विकास रामअवतार खंडेलवाल (२२), राहूल सखाराम माळी (२१), अशी अटक केलेल्या चौघांची नावे असून ते कोल्हापूर येथील इचलकंरजीचे रहिवाशी आहेत. तसेच हिना उर्फ आयशा अस्लम पठाण (२१), असे त्यांच्या महिला साथीदाराचे नाव असून ती नवी मुंबईतील कौपरखैराणे परिसरात राहाते. मनिष आणि आयशा हे दोघे मित्र आहेत. मनिष, संतोष, विकास आणि राहूल हे चौघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात मुंबई, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्य़ामध्ये जबरी चोरी, दरोडा, खंडणी, शस्त्रे बाळगणे, आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी दिली.