निवडणुकीसाठी राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवून दंगली घडवायच्य, असा कट रचला जातोय, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी शिंदे गट-भाजपावर केला होता. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांकडून टीकास्र सोडण्यात येत आहे. दरम्यान, राऊतांच्या या आरोपांना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी यापूर्वी स्वत: दंगली पेटवण्याची भाषा केली आहे. त्यामुळे त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “पळपुट्या माणसाच्या पक्षानं मोदींना…”, विधानसभेत मुनगंटीवार भडकले; राहुल गांधी प्रकरणी गदारोळ!

काय म्हणाले दीपक केसरकर?

संजय राऊत यांनी स्वत: यापूर्वी मुडदे पाडण्याची आणि दंगली पेटवण्याची भाषा केली आहे. त्यामुळे त्यांचे आरोप गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आज देशात संजय राऊतांच्या विधानांना कोणीही गांभीर्याने घेत नाही, असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं.

राऊतांनाच दंगली भडकवायच्या आहेत

एकेकाळी सामना हे शिवसेनेचं मुखपत्र होतं. शिवसेना काय सांगते हे सामानाद्वारे लोकांना कळत होतं. मात्र, आज सामनाची प्रतिष्ठा संजय राऊतांमुळे कमी झाली आहे. संजय राऊतांनी आता आपल्या भाषणाला मर्यादा घातल्या पाहिजे. दंगलीची भाषा बोलणं हे सुद्धा चुकीचं आहे. संजय राऊतांनाच राज्यात दंगली घडवायच्या असतील म्हणून ते अशा प्रकारची भाषा वापरत आहेत. त्यामुळे सरकारने याची चौकशी करावी, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “विधीमंडळात जायला दोघांसाठी वेगळा रस्ता…” फडणवीस-ठाकरे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट -भाजपावर सडकून टीका केली होती. महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि निवडणुकीला सामोरे जायचं अशी पटकथा पडद्यामागे लिहिली जात आहे. राज्यात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला जनतेचा पाठींबा मिळतो आहे, त्यामुळे भाजपासह त्यांचे बगलबच्चे हादरले आहे. त्यामुळे जाती आणि समाजांमध्ये तेढ निर्माण करायची आणि दंगली घडवायचा कट रचला जातोय, असे ते म्हणाले होते.