मुंबई : चर्नी रोड येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित मराठी भाषा भवनाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही बदल, सूचना करतानाच मातृभाषेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्याला शालेय शिक्षणमंत्री व भाषामंत्री दीपक केसरकर यांनी अनुकूलता दर्शविल्याचे सांगण्यात आले.
विधान भवनात गुरुवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मराठी भाषा भवनाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. बैठकीला उद्धव ठाकरे, दीपक केसरकर, सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर, मनीषा कायंदे, चेतन तुपे, महादेव जानकर, अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, निलय नाईक, प्रसाद लाड, धीरज देशमुख, रामदास आंबटकर आदी सर्व पक्षीय सदस्य व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आपल्या सरकारच्या काळातच मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय घेतला होता, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. येणाऱ्या पिढय़ांना मराठीचे महत्त्व आणि थोरवी समजावी या हेतूने संकल्पित केलेले मराठी भाषा भवन ही वास्तू असली पाहिजे, अशा काही सूचना त्यांनी बैठकीत केल्या. मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत सर्वाच्या सूचनांचे स्वागत करतानाच प्रस्तावित भाषा भवनाच्या रचनेत आवश्यक ते बदल करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले.