सध्या अटकेत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत हे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी शनिवारी शिवडी न्यायालयासमोर हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयाने त्यावर १८ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे.

शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता.

न्यायालयाने यापूर्वी मेधा यांच्या तक्रारीची दखल घेतली होती आणि राऊत यांना समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या नावे जामीनपात्र वॉरन्ट बजावले होते. त्यानंतर १८ जुलै रोजी राऊत न्यायालयात हजर झाले. त्यानंतर त्यांच्या विरोधात बजावलेले जामीनपात्र वॉरन्ट न्यायालयाने रद्द केले होते. तसेच जबाब नोंदवण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने राऊत यांना दिले होते.

शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.