राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध’ (एनटीएस) या स्पर्धा परीक्षेची राज्य स्तरावरील परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल जाहीर न झाल्याने राज्यभरातील तब्बल ७५ हजार परीक्षार्थी विद्यार्थी हवालदील झाले आहेत.
राज्य स्तरावरील परीक्षेत निवड झालेल्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनाच १३ मे रोजी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेला बसता येणार आहे. पण, ७५ हजार विद्यार्थ्यांमधून आपली निवड झाली आहे का हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कोणत्या ध्येय्याने पुढचा अभ्यास करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. अभ्यासक्रम निश्चित नसल्याने आणि देशस्तरावरील विद्यार्थ्यांशी स्पर्धा असल्याने या परीक्षेसाठी अभ्यासाचा एकेक दिवस महत्त्वाचा असतो. पण, राज्याचा निकालच जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचे दिवस वाया जात आहेत.
राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. त्या त्या राज्यांच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील निवडक चार हजार विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परीक्षेला बसता येते. त्यासाठी राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. महाराष्ट्रातून या परीक्षेसाठी ४९५ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. राज्य स्तरावर ही परीक्षा घेण्याची जबाबदारी ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’वर आहे. परीक्षेचा निकाल जास्तीत जास्त ४५ दिवसांत लावणे बंधनकारक असतानाही चार महिने झाले तरी निकाल जाहीर करण्यात परिषदेला यश आलेले नाही. याबाबत परिषदेचे आयुक्त महावीर माने यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. या परीक्षेचे स्वरूप वैकल्पिक स्वरूपाचे असते. असे असूनही निकाल जाहीर करण्यास विलंब का लागावा, असा सवाल एका पालकाने केला.
गेले तीन वर्षे वगळता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा घेतली जाते. दहावीची परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थी एनटीएसच्या अभ्यासाला हात लावत नाही, हे गृहीत धरून एरवीही राज्य स्तरावरील निकाल जाहीर करताना विलंब केला जातो. पण, आता दहावीची परीक्षा संपून दहा दिवस झाले तरी निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत.
परीक्षेच्या निकालातील हा ढिसाळपणा राज्यातील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीवरही प्रतिकूल परिणाम करतो आहे. कारण, इतर राज्ये एव्हाना या परीक्षेला महत्त्व देऊ लागले असून आपल्या विद्यार्थ्यांची कामगिरी वधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागले आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत असताना तब्बल १८ राज्यांनी आपले निकाल ऑनलाईन जाहीरही करून टाकले आहेत. आतापर्यंत एनटीएसमध्ये पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी महाराष्ट्राचे असत. पण, निकाल लावण्यास होणारा विलंब विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आड येत असून गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राची एनटीएसमधील कामगिरी इतर राज्यांच्या तुलनेत कमालीची घसरली आहे, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली.
‘एनटीएस’ नेमके आहे काय?
घोकंपट्टीवर आधारलेल्या नेहमीच्या परीक्षा पद्धतीला फाटा देऊन अभ्यासक्रमातील मुलभूत संकल्पना नेमकेपणाने स्पष्ट झाल्या आहेत का याचा कस एनटीएसमध्ये पाहिला जातो. या वर्षी १८० गुणांच्या लेखी परीक्षेबरोबरच २० गुणांच्या मुलाखतीलाही विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेची काठीण्यपातळीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांच्या बरोबरीची असते. त्यामुळे, हुशार व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जाते. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इतिहास, भूगोल, पर्यावरण, गणित या विषयांचा कस या परीक्षेत पाहिला जातो. पण, त्या करिता अभ्यासक्रम निश्चित नसल्याने विद्यार्थ्यांना अवांतर अभ्यास करावा लागतो. परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना केंद्र सरकारकडून काही ठराविक रक्कम दर महिन्याला शिष्यवृत्ती म्हणून प्रदान करण्यात येते.