विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या निकालास विलंब होत असल्याच्या रागातून एका विद्यार्थ्यांने विद्यापीठ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या युवकाने रागाच्या भरात विद्यापीठाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार ई-मेल पाठविले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपी विद्यार्थी हा वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. दरवर्षी विद्यापीठाच्या निकालांना विलंब होत असल्यामुळे त्याने हे कृत्य केले होते. त्याने सलग चार ई-मेल विद्यापीठाला पाठविले होते. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने १२ जुलैला तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून शुक्रवारी गुन्हा नोंदविला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.