स्पेनमधील कंपनीकडून उपलब्ध होणाऱ्या टाल्गो ट्रेनमुळे अंतर ताशी २०० किलोमीटर वेगाने कापणे शक्य
देशाच्या आर्थिक राजधानी पासून राजधानीपर्यंतचा प्रवास आता अवघ्या १२ तासांमध्ये पूर्ण करणे शक्य होणार आहे. स्पेनमधील कंपनीकडून उपलब्ध होणाऱ्या टाल्गो ट्रेनमुळे दोन महानगरांमधील अंतर ताशी २०० किलोमीटर या वेगाने कापणे शक्य होणार असून १६ तासांचा प्रवास चार तासांनी कमी होऊन १२ तासांवर येऊन ठेपणार आहे. विशेष म्हणजे, इतर ट्रेनच्या तुलनेत या ट्रेनला ३० टक्के कमी ऊर्जा लागणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने भारतीयांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या असून बुलेट ट्रेनचेही नियोजन करण्यात येत आहे. त्यातच मुंबई ते दिल्ली या महानगरातील प्रवास कमी करण्यासाठी टाल्गो ट्रेन वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पेनमधील बार्सिलोना कंपनीकडून या ट्रेन भारतीय रेल्वेला मिळणार असून सुरुवातीला त्यासाठी भारताला कुठलेही शुल्क चुकवावे लागणार नाही. तसेच, रेल्वेच्या चाचण्याही विनाशुल्कच होणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यान या ट्रेन धावण्याआधी तीची चाचणी मुरादाबाद ते बरेली आणि मथूरा ते पलवल या मार्गावर करण्यात येणार आहे. नऊ डब्यांची असलेल्या या ट्रेनला अ‍ॅल्युमिनिअमचे डबे असून इतर ट्रेनच्या मानाने तिला धावण्यासाठी ३० टक्के कमी ऊर्जा लागणार आहे. वजनाने हलक्या असलेली ही ट्रेन ताशी २०० किमीपर्यंतचा वेग पकडू शकते. तसेच, प्रवाशांना यात इतर ट्रेनच्या तुलनेत कमी हादरे बसतील. चाचण्यानंतर या रेल्वेच्या तिकीटदराविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.